शांततेची किंमत...!
शांततेची किंमत...!
कधी कधी आपण अगदी बरोबर असतो. मन, बुद्धी आणि कृती सर्व काही योग्य असतं. तरी सुद्धा असा क्षण येतो, जेव्हा पुढे जाण्याऐवजी पाऊल मागे घ्यावं लागतं. कारण वाद वाढवण्यापेक्षा नातं टिकवणं अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून आपण माघार घेतो.
ही माघार अनेकदा समोरच्याला विजया सारखी वाटते. पण वास्तवात ती माघार म्हणजे आपल्या संयमाची, समजूतदारपणाची आणि माणुसकीची जाणीव असते. चूक नसताना ही मौन पाळणं, हे कधीही दुर्बलतेचं लक्षण नसतं, तर ते अंतःकरणाच्या सामर्थ्याचं द्योतक असतं.
काही माणसं, काही नाती आणि काही क्षण हे इतके मूल्यवान असतात की त्यांच्यासाठी स्वतःच्या ‘अहं’ला मागे टाकावं लागतं. सत्य आपल्या बाजूने असताना ही, ते बोलून जर नातं धोक्यात येणार असेल, तर त्यापेक्षा शांत राहणं योग्य वाटतं.
ही शांतता म्हणजे दुर्बलता नव्हे. ती प्रेम, समजूत आणि क्षमाशक्तीचं प्रतीक असते. ही एक अशी पवित्र माघार असते, जी नात्यांमध्ये फूट पडू नये म्हणून घेतलेली असते.
कधी कधी काही क्षणांमध्ये उत्तर देणं सहज शक्य असतं, पण त्याचे परिणाम खोलवर जखमा करणारे असू शकतात. शब्दांनी झालेली जखम सहज भरून येत नाही. त्यामुळे जिथे वाद उद्भवण्याची शक्यता असते, तिथे शांत राहणं हेच खरे शहाणपण असते.
जर आपल्या त्या एक निर्णयामुळे गप्प बसण्यामुळे एखादं नातं तुटण्यापासून वाचलं, तर ती माघार पराभव नव्हे, तर माणुसकीचं मोठं यश असतं.
खरं सामर्थ्य याच्यात आहे. जेव्हा चूक नसताना ही आपण क्षमा करतो, जेव्हा अन्याय झालेला असून ही संयम राखतो, आणि जेव्हा वाद टाळण्यासाठी आपली बाजू न मांडता माघार घेतो.
खरं तर हेच आयुष्याच्या मोठ्या परीक्षांपैकी एक असतं. सत्य सांगणं आणि स्वाभिमान राखणं सोपं आहे; पण नातं जपण्यासाठी त्यावर संयमाची चादर पांघरून शांत राहणं. हेच खऱ्या अर्थानं माणूस असण्याचं लक्षण आहे.
चूक नसताना ही घेतलेली माघार ही शब्दांनी न व्यक्त करता येणारी अंतर्गत ताकद असते. ती कधी कधी मनाला बोचणारी ही ठरते. पण जसजसा काळ पुढे जातो, तसतसं समजतं की ती माघार, ती शांतता आणि त्या न बोललेल्या भावना यांनी एक नातं वाचलं, एक मन जपलं.
आणि शेवटी असं वाटून जातं – “शांत राहिलो, ते चूक नव्हतं… ते योग्यच होतं.”
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा