शब्दांचे शिल्पकार कैलास चव्हाण-पाटील...!
शब्दांचे शिल्पकार कैलास चव्हाण-पाटील...!
शब्द हे तलवारीपेक्षा तीव्र असतात,असं म्हणतात. पण या शब्दांना जर योग्य दिशा मिळाली आणि सजग मन लाभलं, तर ते समाज परिवर्तनाचे साधन ठरतात. अशाच शब्दांच्या वाटेवर चालत, दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाशी नातं जोडणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे. कैलास पुंजाराम चव्हाण-पाटील.
त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील शेंदुर्णी या छोट्याशा खेडेगावात, एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती सोपी नव्हती, पण स्वप्नं मोठी होती. चिखलओहोळ या गावात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 1986 साली ते नाशिक शहरात पुढील शिक्षणासाठी आले. नवीन शहर, नवीन वाटा, पण ध्येय ठाम होतं.काहीतरी वेगळं करायचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं.
त्यांनी पदवी आणि उच्च पदवी घेतल्यानंतर संगणक आणि स्टेनोग्राफी कोर्स करत काळाच्या गरजेला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं. नोकरीसाठी सिन्नर, नाशिक, पुणे अशा ठिकाणी संधी मिळत होत्या. नामांकित कंपन्यांचे कॉल लेटर्स त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक होते. पण त्यांच्या मनात वेगळीच ओढ होती. वृत्तपत्र क्षेत्रात काम करण्याची.
हीच ओढ त्यांना लोकमत- जळगाव आणि नंतर सकाळ- पुणे व नाशिक या मान्यवर वृत्तपत्रांमध्ये घेऊन गेली. 1993 साली "सकाळ पेपर्स" मध्ये त्यांनी आपली वाटचाल सुरू केली, आणि तब्बल तीन दशके ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. ही केवळ नोकरी नव्हे, तर समाजाशी असलेलं एक भावनिक नातं आहे.
कोरोना महामारीसारख्या संकटाच्या काळात, जेव्हा सर्वत्र भीतीचं वातावरण होतं, तेव्हा त्यांनी आठ-दहा तास आपली सेवा अविरतपणे दिली. शब्दांमधून जनतेला योग्य माहिती देणं, समाजात आशा जागवणं, हे त्यांनी स्वतःचं कर्तव्य मानलं.
पण कैलासजींचं व्यक्तिमत्त्व केवळ पत्रकारापुरतं मर्यादित नाही. समाजप्रबोधन, शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थी गुणगौरव, सामाजिक मेळावे अशा अनेक उपक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होतात. अप्पर आयुक्त, पोलीस निरीक्षक, शिक्षक, सुभेदार, जीएसटी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत काम करताना त्यांनी आपलं संयमित, नम्र आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व टिकवून ठेवलं आहे.
त्यांचा शांत स्वभाव, कर्मनिष्ठा, आणि दृढ आत्मविश्वास यामुळे ते आजही विभागात अनेकांना मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञानही तितकंच गहिरं आहे.“आयुष्य म्हणजे एक आरसा आहे. आपले विचार, भावना आणि निर्णय हेच आपल्या सुख-दुःखाचे खरे शिल्पकार असतात.”
या प्रवासात त्यांच्या कुटुंबाचीही महत्त्वपूर्ण साथ आहे. त्यांची मुले आज उच्चशिक्षित इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात (आयटी हब- पुणे) उच्च पदांवर कार्यरत आहेत. ही केवळ एका पित्याची नाही, तर एका मार्गदर्शकाची, शिक्षकाची आणि निष्ठावान कुटुंबप्रमुखाची मूक पण तेजस्वी यशोगाथा आहे.
आज आपण जेव्हा समाजात आशेचा किरण शोधतो, तेव्हा अशा व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येतात. ज्यांनी संघर्षांतून यशाचं दीप प्रज्वलित केलं, शब्दांमधून सत्य अधोरेखित केलं आणि निस्वार्थपणे समाजसेवेचं व्रत जोपासलं.
श्री. कैलास चव्हाण-पाटील हे अशाच प्रेरणादायी तेजस्वी जीवनयात्रेचं नाव आहे.त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांचा प्रवास असाच प्रकाशमान आणि प्रेरणादायी राहो...
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा