पैसा की माणूस.....?


पैसा की माणूस.....?

आजचा माणूस कितीही शिकलेला, यशस्वी आणि बुद्धिमान असला, तरी जेव्हा त्याच्या मनात पैशाची हाव निर्माण होते, तेव्हा तो सर्वांत अडाणी ठरतो. कारण अशा वेळी तो आपले माणूसपण गमावतो.

पूर्वी माणूस नात्यांमध्ये गुंतलेला असायचा. एकमेकांना वेळ द्यायचा, आपुलकीने संवाद साधायचा, आणि माणुसकी जपत जगायचा. पण आज तो व्यवहारांच्या जाळ्यात अडकून गेला आहे.पैशाच्या मागे धावताना त्याला हेच आठवत नाही, की नाती हीच आयुष्यातली खरी संपत्ती आहेत.

आजची परिस्थिती पाहिली, तर काळीज सुन्न होतं. आईवडील वृद्धाश्रमात राहतात, भावंडं न्यायालयाच्या दारात उभी आहेत, आणि जिवाभावाची माणसं गैरसमजांमध्ये हरवलेली आहेत. आणि या साऱ्याचं मूळ काय? तर काही रुपये, जमिनीचा वाद, व्यवसायाची वाटणी किंवा एखादं घर!

माणूस पैशासाठी नाती तोडतो, पण हे विसरतो की पैसा क्षणिक असतो. आज आपल्या हातात असलेला पैसा उद्या दुसऱ्याच्या खिशात जातो. पण एकदा हरवलेली माणसं, तुटलेली नाती आणि संपलेली माया, पुन्हा मिळवणं केवळ अशक्य असतं.

पैशासाठी आपण आपल्या जवळच्या माणसांवर ओरडतो, अपमान करतो, त्यांचं मन दुखावतो. अशा वागणुकीतून आपण नात्याचा आत्मा हळूहळू मारून टाकतो. त्या नात्याच्या अवतीभवती असलेली ऊब, आपुलकी आणि विश्वास यांचा संपूर्ण नाश होतो.

नातं तुटलं की, ते परत जुळवणं फार कठीण जातं. "माफ करा" हे शब्द उच्चारता येतात, पण एकदा तुटलेला विश्वास परत मिळवणं सहज शक्य होत नाही. पैशाच्या वादातून सुटलेले शब्दांचे घाव इतके खोल जातात की, ते कायमचे जखम करून जातात.

हक्काने बोलणारी माणसं अनोळखी वाटू लागतात. जी माणसं कधी काळी आपल्या सुखदुःखात सहभागी होती, ती आता केवळ स्मृतीत उरतात. आणि एका क्षणी मनात फक्त पश्चात्ताप उरतो.थोड्याशा पैशासाठी आपण किती मोठं माणूस गमावलं!

ज्याला वेळेत हे उमगतं, तोच खऱ्या अर्थाने सुखी माणूस ठरतो.ज्याच्या नजरेत नात्यांची किंमत असते, ज्याच्या मनात माणसांसाठी जागा असते, आणि ज्याच्यासाठी पैसा हे केवळ एक साधन आहे.अशी माणसं आयुष्यभर समाधानात जगतात. त्यांचं आयुष्य सुंदर नात्यांनी भरलेलं असतं, त्यांना एकटेपणा कधीच स्पर्श करत नाही.

शेवटी मोजमाप हे पैशाचं नसावं, तर नात्यांचं असावं.
तुम्ही किती पैसा कमावला, हे महत्त्वाचं नाही;
तर पैशाच्या प्रवासात किती माणसं जपली, किती नाती टिकवली, हेच खरं यश. म्हणूनच,नाती जपा, माणसं जपा.पैसा पुन्हा कमावता येईल, पण एकदा माणूस गेला… की कायमचाच गमावला जातो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !