नात्यांच्या गर्दीत हरवलेलं मन....!


नात्यांच्या गर्दीत हरवलेलं मन....!

आजच्या काळात भावना म्हणजे जणू एक बाजारच बनला आहे. कोणी किती हसावे, किती रडावे, कुणाशी किती जवळीक साधावी याची किंमत आता दुसरेच ठरवतात.

आपण मनापासून प्रामाणिक असतो. म्हणूनच प्रत्येक नातं आपलंसं वाटतं, प्रत्येक व्यक्तीत आपलेपणा शोधतो. आपण मन मोकळं करतो, आपली खरं परिस्थिती सांगतो… पण आपल्या भावनांचं मोल ठरवण्याचा अधिकार दुसऱ्यांकडेच असतो.“हे जास्तच झालं”, “काय उगाचच भावनिक होतोस”, “याला इतकं का वाटतं?”

कधीकधी आपण एखाद्यासाठी वेळ देतो, समजून घेतो, त्यांच्यासाठी झटतो. परंतु हळूहळू त्यांना त्याची सवय होते.किंमत मात्र लागत नाही.आणि जेव्हा आपण आपल्या वेदना स्पष्ट शब्दांत सांगू लागतो, तेव्हा समोरचं व्यक्ती ऐकतेही, पण समजून घेत नाही.

आपल्या भावना त्यांच्या दृष्टीने "ओव्हर रिऍक्शन" वाटतात.त्यांना गरज असेपर्यंत आपण “आपले” असतो.
एकदा गरज संपली की, त्या नात्यांचं तेज हरवतं… आणि चेहऱ्यावर लावलेला माणुसकीचा मुखवटा सहज गळून पडतो.

तेव्हाच उमगतं की,जिथे आपण मन उघडलं, तिथेच आपल्याला उघडं पाडण्यात आलं.जिथे आपुलकीची अपेक्षा ठेवली, तिथे उपेक्षा मिळाली.आपण मागे वळून बघावं, सावरावं इतकाही वेळ कुणाकडे उरलेला नसतो.

जेव्हा ज्याला “आपलं” मानलं, त्यानेच आपल्या भावनांची किंमत ठरवायला सुरुवात केली…तेव्हाच त्या नात्यांची सर्वात खोल जखम होऊन राहते.

हे सगळं लक्षात येईपर्यंत, संध्याकाळ ओलांडून गेलेली असते.सूर्य मावळलेला असतो…कधी काळी मनात भरलेली भरती आशा, अपेक्षा, विश्वास हळूहळू ओहोटीला लागते. निराशा, तुटलेली स्वप्नं, आणि मौन आणि शेवटी काय उरतं?

एकांत.

तोच एकांत, जो सुरुवातीला असह्य वाटतो…हळूहळू त्याच्यातच एक शांती सापडते.तो शिकवतो. "तू जिथे मोकळा झालास, तिथे कोणीच नव्हतं." म्हणूनच, पुढच्या वेळी मन उघडायचं असेल, तर आपण स्वतःलाच विचारतो.“हे खरंच योग्य ठिकाण आहे का?”

हाच अनुभव आपल्याला परिपक्व करतो.
माणसं ओळखायला शिकवतो.आपल्या भावनांचं खरं मोल आपल्यालाच कळवतो.आणि मग एक दिवस आपण ठामपणे ठरवतो."आता मन मोकळं करायचं, पण योग्य व्यक्तीसमोर."

कारण भावना या विक्रीसाठी नसतात.त्या जपण्यासाठी असतात. योग्य हृदयात,योग्य नात्यात.एकांताने दिलेला हा शांत,पण स्पष्ट संदेश आपल्याला स्वतःकडे परत नेतो.आपल्या अस्तित्वाचं, आपल्या आत्मिक मूल्याचं भान देतो.आणि मग भावनांचा बाजार मागे पडतो,उरतो फक्त “आपण” थोडं अधिक शहाणं झालेलं,पण नक्कीच अधिक खऱं, आणि अधिक भक्कम.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !