आपलेपणाचा मुखवटा...!
आपलेपणाचा मुखवटा...!
माणूस स्वभावतः भावनिक असतो. नात्यांची उब, आपुलकीची भावना, आणि आपल्यासाठी कोणीतरी आहे हा विश्वास या गोष्टी त्याच्या आयुष्याला अर्थ देतात. कोणी आपल्याशी सौम्य, प्रेमळ वागलं, एकटेपणी साथ दिली, काळजी घेतली. की आपलं मन त्यांच्याकडे आपोआप ओढलं जातं. आपलेपणाच्या या भावनेनं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ते आपलेच आहेत, असं वाटायला लागतं.
या विश्वासाच्या आधारे आपण हळूहळू मन उघडू लागतो. आतल्या खोल कप्प्यांत जपलेली दुःखं, जुन्या आठवणींच्या जखमा, अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचे तुकडे सगळं त्यांच्यापुढे उघडं करत जातो. कारण, त्या व्यक्तीला आपण “आपली” समजतो.
पण इथेच आयुष्याची खरी शोकांतिका सुरू होते.
जे आपल्याला समजून घेतात असं वाटतं,तेच आपल्याच भावना इतरांसमोर चर्चेचा किंवा मनोरंजनाचा विषय बनवतात.ज्या गोष्टी आपण काळजात दडवून ठेवलेल्या असतात,त्या साऱ्यांची वेशीपलीकडून वाऱ्यासारखी चर्चा सुरू होते.आणि जेव्हा हे वास्तव आपल्यासमोर उभं राहतं,तेव्हा मनात एक विचित्र शांतता पसरते.न रडणं येतं, न कुठे तक्रार करता येते.फक्त आत खोलवर जळजळ करणारा एकच प्रश्न मनात घुमत राहतो.“मी इतका विश्वास का ठेवला?”
आजच्या काळात "आपलेपण" ही भावना देखील मुखवट्याआड दडलेली आहे.लोक तुमच्याशी बोलतात, तुम्हाला समजून घेत असल्याचा अभिनय करतात. तुमच्या भावना जाणून घेण्याचा आव आणतात पण त्यांच्या डोळ्यांमागे काळजी नसते, असते फक्त कुतूहल.
ते तुमचं दुःख जाणून घेण्याच्या हेतूनं ऐकत नाहीत,
तर ते किती वेगळं, किती क्लिष्ट आहे हे दुसऱ्याला सांगण्याच्या तयारीत असतात.अशा वेळी “आपलं” म्हणणारी माणसं भरपूर भेटतात,पण खरंच आपलं समजून घेणारे हाताच्या बोटावर मोजावे लागतात.
जगण्यात भावनिक साथ देणारे,मन समजून घेणारे,
कधी काही न बोलता फक्त जवळ बसणारे.असे लोक फार थोडे असतात.
बाकीचे फक्त आपल्या आयुष्यातील घटनांचं “बातमीकरण” करतात.आपल्या दुःखांचा बाजार मांडतात,आपल्या भावनांना हलकं करतात.
मन मोकळं करताना काळजीपूर्वक करा.प्रत्येकासमोर आपली वेदनांची कवाडं उघडू नका.सर्वांमध्ये समजून घेण्याची ताकद नसते;अनेकजण फक्त ऐकतात… आणि पुढे सांगतात.
आपुलकीने वागणारा प्रत्येकजण आपलाच असेल असं नाही,आणि शांतपणे ऐकणारा प्रत्येकजण विश्वासू असेल, याची खात्री देता येत नाही.म्हणूनच, आपल्या भावना आपल्या आत्म्यासारख्या जपाव्यात.त्या कोणाला, कितपत, आणि कधी द्यायच्या हे समजणं हीच खरी शहाणपण.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा