संघर्षातून प्रगतीकडे साहेबराव दामू पाटील यांचा प्रवास...!
संघर्षातून प्रगतीकडे साहेबराव दामू पाटील यांचा प्रवास...!
धरणगाव तालुक्यातील साकरे या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य पण मूल्यांनी समृद्ध अशा कुटुंबात साहेबराव दामू पाटील यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी होती. त्यांचे वडील शेती करत आणि घर चालवण्यासाठी राबत असत. लहान वयातच साहेबराव यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट पाहिले, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष जवळून अनुभवले. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक विचार खोलवर रुजला आयुष्यात आणि घराच्या प्रगतीसाठी कष्टाशिवाय पर्याय नाही.
घरात मोठे असल्यामुळे लहान वयातच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. घर चालवताना त्यांनी आई-वडिलांना शेतीकामात मदत केली आणि त्याचबरोबर स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोणतीही शैक्षणिक सोय नसतानाही त्यांनी जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट यांच्या बळावर आपले शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते तालुका दूध संघ, एरंडोल येथे सुपरवायझर म्हणून रुजू झाले. कामातील प्रामाणिकपणा, निष्ठा आणि शिस्त या गुणांमुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली. त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत त्यांची नियुक्ती जळगाव येथील 'विकास दूध फेडरेशन'मध्ये वरिष्ठ सुपरवायझर म्हणून झाली. संघ स्थापनेपासूनच ते सक्रिय सदस्य होते. जवळपास संपूर्ण आयुष्य त्यांनी दूध संघाच्या विकासासाठी समर्पित केलं आणि वयाच्या साठव्या वर्षी सन्मानाने सेवानिवृत्त झाले.
साहेबराव पाटील यांचे जीवन केवळ नोकरीपुरते मर्यादित नव्हते. ते एक आदर्श कुटुंबप्रमुख होते. त्यांना चार मुले आणि एक कन्या आहे. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या मुलांमध्ये प्रामाणिकपणा, मेहनतीची तयारी आणि सुसंस्कार यांचे बीज पेरले. आज त्यांच्या मुलांनीही त्यांच्याच पावलांवर चालत स्वाभिमान आणि स्वावलंबन यांचा आदर्श जीवनात उतरवला आहे.
मोठे चिरंजीव प्रवीण पाटील यांनी प्रायव्हेट क्षेत्रात चालक म्हणून नोकरी स्वीकारून कुटुंबाला आधार दिला आहे. द्वितीय चिरंजीव प्रदीप पाटील यांनी मुसळी येथे गायींचा दूध व्यवसाय सुरू करून वडिलांचा वारसा पुढे नेला आहे. तिसरे चिरंजीव एक्वागार्डच्या व्यवसायात कार्यरत असून, मेहनतीने आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. तर चौथे चिरंजीव भारतीय सैन्यात कार्यरत असून देशसेवेसाठी समर्पित आहेत. साहेबराव पाटील यांच्या संस्कारांचा हा ठसा त्यांच्या मुलांच्या आयुष्यात स्पष्टपणे दिसून येतो आणि हेच त्यांच्या जीवनातील खरे यश आहे.
साहेबराव पाटील हे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत भाव असतो, डोळ्यांत आत्मविश्वास असतो आणि वागण्यात नम्रता असते. त्यांनी कधीही कोणाशी उगाच वाद घातला नाही, ना कुणाला कमी लेखले. त्यांच्या वर्तनातून आणि जीवनातून इतरांना शिकण्यासारखे खूप काही आहे.
आज ते निवृत्त जीवन जगत आहेत. मात्र, त्यांनी आयुष्यभर जपलेले आदर्श, दिलेले संस्कार आणि दाखवलेली कष्टाची वाट आजही त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला दिशा देत आहे. त्यांच्या प्रामाणिकतेची आणि सचोटीची हीच खरी संपत्ती आहे.
साहेबराव दामू पाटील हे केवळ एक नाव नसून, एक विचार आहे. असा विचार जो सांगतो.परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल आणि प्रामाणिकपणे जीवन जगण्याचे व्रत घेतले असेल, तर यश नक्की मिळते.
त्यांचे आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी गाथा आहे. अशी गाथा जी हृदयाला भिडते, डोळ्यांत पाणी आणते आणि मनात नवचैतन्य निर्माण करते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा