वाट लावू नका, वाट दाखवा....!
वाट लावू नका, वाट दाखवा....!
माणसाचं आयुष्य हा एक अखंड प्रवास आहे.कधी काट्यांनी व्यापलेला, तर कधी सुगंधी फुलांनी सजलेला.
या प्रवासात अनेक वळणे, अनेक चढ-उतार येतात.परंतु या साऱ्या प्रवासात माणूस सर्वात मोठी चूक तेव्हाच
करतो,जेव्हा तो दुसऱ्याला खाली खेचण्यात, त्याला हरविण्यात,किंवा त्याची वाट लावण्यात आपला वेळ आणि उर्जा वाया घालवतो.
जो इतरांना संपविण्याची तयारी करतो,तो स्वतःला वाचवण्यात कायम कमी पडतो.कारण द्वेषाची आग कधीही फक्त दुसऱ्यालाच जाळत नाही,ती आपल्यालाही भस्म करून टाकते.आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो,जो दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालतो,त्याचं स्वतःचं आयुष्य कधीच संपत नाही.त्याचा प्रकाश काळाच्या ओघातही झाकोळला जात नाही हीच जीवनाची खरी नियती,हीच अस्तित्वाची खरी शाश्वतता आहे.
माणसाला दुसऱ्याची वाट लावताना,स्वतःची वाट केव्हा लागते हे त्याला समजतही नाही.मत्सर, राग, सूड आणि वैर या भावना क्षणभराचं समाधान देतात,पण
आयुष्यभराची पोकळी निर्माण करतात.अशा भावनांतून सुख कधीच जन्मत नाही.त्या फक्त अंतःकरणातील शांतता हिरावून घेतात.
म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यात वेळ घालवू नका.त्या ऐवजी स्वतः योग्य वाटेला लागा,योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य मार्ग स्वीकारा.कारण जो स्वतः योग्य मार्गावर चालतो,तो इतरांसाठीही वाट दाखवणारा दीप ठरतो.त्याचं जीवन स्वतःच एक मार्गदर्शक बनतं.
कोणाची वाट लावण्यापेक्षा,वाट दाखवण्याचं कार्य करा.
कारण हात जर कोणाला खाली पाडण्यासाठी नाही,
तर उचलण्यासाठी पुढे गेला,तर त्याच क्षणी तो हात देवाच्या हातासारखा पवित्र होतो.माणसाचा खरा धर्म, खरा धर्मकारण,हीच दयाळुता, माणुसकी आणि प्रेम आहे.
माणसाचा दर्जा कधीच त्याच्या जातीवर, धर्मावर किंवा संपत्तीवर ठरत नाही.तो ठरतो त्याच्या विचारांच्या उंचीवर,त्याच्या कर्मांच्या प्रामाणिकतेवर,आणि त्याच्या मनाच्या पवित्रतेवर.धर्म कोणताही असो, देव नेहमी त्या मनात वसतो जिथे करुणा आहे, प्रेम आहे आणि माणुसकी आहे.
शेवटी देवासमोर कोणीही जात, धर्म, पंथ किंवा पद विचारत नाही.तेव्हा एकच प्रश्न विचारला जातो.
“तू किती माणूस होतास?” तू कुणाचं आयुष्य उजळवलंस का? तू कुणाचं दुःख हलकं केलंस का?
तू कोणाचं मन जपलंस का?
हाच खरा धर्म आहे,हाच खरा कर्माचा हिशोब आहे.
म्हणूनच, दुसऱ्याला खाली खेचण्यात कधीच अर्थ नाही.
त्याला वर नेण्यात, त्याला आधार देण्यातच खरा आनंद आहे.दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला वाट
दाखवण्याचा प्रयत्न करा.कारण इतरांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा. स्वतः कधीच अंधारात हरवत नाही.
त्याचं नाव, त्याचा प्रकाश आणि त्याचं चांगुलपण
काळाच्या ओघातही अमर राहतो.
माणुसकी जपा.कारण शेवटी देव तिथेच असतो,
जिथे मन शुद्ध असतं, विचार उजळलेले असतात,
आणि कुणासाठी काहीतरी चांगलं करण्याची इच्छा जिवंत असते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा