“श्रमातून साधलेले ईश्वरदर्शन स्वर्गीय नानासाहेब गोकुळ वामन महाजन”

“श्रमातून साधलेले ईश्वरदर्शन स्वर्गीय नानासाहेब गोकुळ वामन महाजन”

(धानोरा, तालुका चोपडा)

धानोरा या मातीत जन्मलेले, कष्टाची आणि साधेपणाची शिदोरी घेऊन आयुष्यभर श्रमाचा आणि भक्तीचा संगम साधणारे, सदगुरू भक्त, संतस्वभावी, आणि खरे कर्मयोगी स्वर्गीय नानासाहेब गोकुळ वामन महाजन.

सामान्य कुटुंबात जन्मलेले नाना यांनी आपल्या परिश्रमाच्या आणि निश्चयाच्या बळावर असामान्य उंची गाठली. वडिलोपार्जित दोन एकर जमिनीपासून त्यांनी, कुटुंबाच्या सहकार्याने, अखंड कष्टाच्या आणि
नियोजनाच्या बळावर शंभर एकर बागायती शेती उभी केली.हे केवळ आर्थिक यश नव्हते तर ते होते एका शेतकऱ्याच्या अध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक.

नाना यांचं आयुष्य हे “परिश्रम, प्रपंच आणि परमेश्वर” या त्रिसूत्रीवर आधारलेलं होतं. त्यांच्या दृष्टीने शेती म्हणजे केवळ धंदा नव्हता, तर तीच होती ईश्वरसेवा.माती नांगरताना, झाडांना पाणी घालताना, पिके वाढताना त्यांना प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाचं रूप दिसायचं.
त्यांच्या हातात नांगर आणि मनात नामस्मरण हीच त्यांची खरी ओळख होती.

संत सावता माळींच्या शिकवणुकीने प्रेरित होऊन नाना नेहमी म्हणायचे“कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी.”ही ओळ त्यांनी केवळ उच्चारली नाही, तर जगली.त्यांच्यासाठी शेती म्हणजे विठ्ठलभक्ती, आणि श्रम म्हणजे साधना.

ते सदैव म्हणायचे“संसारातील कर्तव्य हेच विठ्ठलस्वरूप आहे. प्रारब्धात मिळालेल्या कार्यात श्रद्धेने आणि समर्पणाने राहिलं, तर मोक्ष सहज मिळतो.”त्यांच्या आयुष्यात या विचारांची जणू मूर्त रूपात प्रचीती येत असे.

सतगुरू हंसतेजजी महाराज सांगतात.“दिनभर करू काम सु धंदा, सांज पडे स्वामी ना बंदा.”नाना यांच्या जीवनात हे वचन अक्षरशः उतरलं होतं.ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत श्रम करायचे, पण त्यांच्या श्रमात थकवा नसे, कारण त्यांना ठाऊक होतं की त्यांच्या प्रत्येक घामाच्या थेंबात विठ्ठल आहे.

धानोरा या लहानशा गावातून त्यांनी सुरू केलेला प्रवास आज प्रेरणेचा दीप झाला आहे.सामान्य कुटुंबात जन्म घेऊन, असामान्य परिश्रमाने उंच भरारी घेणाऱ्या नानांनी दाखवून दिलं की, यश हे नशिबाने नाही तर श्रमाने मिळतं.त्यांच्या कष्टाची आणि प्रामाणिकतेची फळं आज त्यांचा परिवार, समाज आणि गाव अनुभवत आहे.

नाना यांनी शेतीतून केवळ संपत्ती निर्माण केली नाही, तर त्यांनी “माणुसकी”ही जोपासली.त्यांच्या मळ्यात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाशी ते प्रेमाने वागत, त्यांना सन्मान देत.त्यांची नम्रता, शिस्त आणि दयाळू स्वभाव यामुळे ते केवळ एक शेतकरी नव्हते तर सर्वांसाठी प्रेरणास्थान होते.

त्यांच्या जाण्याने एक साधा पण विलक्षण आत्मा हरपला आहे.त्यांनी शिकवले की ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही, कारण ईश्वर हा आपल्या कामात, आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि आपल्या श्रमांमध्येच आहे.त्यांनी मळ्यातच ईश्वर पाहिला, पिकात विठ्ठल अनुभवला, आणि श्रमात समाधी गाठली.

आजही त्यांच्या मळ्यातील झाडांमध्ये, ओलसर मातीमध्ये आणि वाहणाऱ्या पाण्यात त्यांच्या श्रमांचा सुवास दरवळतो.त्यांच्या कार्याची, भक्तीची आणि परिश्रमाची गाथा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

स्वर्गीय नानासाहेब गोकुळ वामन महाजन यांनी
आपल्या आयुष्याने हे सिद्ध केलं की “कष्टातूनच कृपा मिळते, श्रमातूनच शांती मिळते, आणि कार्यातूनच ईश्वरप्राप्ती होते.”

आज नाना शरीराने आमच्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी, त्यांच्या शिकवणी आणि त्यांच्या मूल्यांचा सुवास आमच्या प्रत्येक श्वासात आहे.त्यांच्या आदर्शाने आम्हाला शिकवलं “संसार हा विठ्ठलस्वरूप आहे, आणि कर्तव्य हीच पूजा आहे.”

त्यांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे श्रद्धेचा, साधेपणाचा आणि परिश्रमाचा अमोघ वारसा.धानोरा गावाने एक शेतकरी गमावला असला तरी, त्यांनी मागे ठेवलेली प्रेरणा कायम प्रकाशमान राहील.

नाना, आपण शरीराने आमच्यात नसले तरी, आपल्या कर्माचा आणि भक्तीचा सुगंध या मातीत सदैव दरवळत राहील.आपल्याला विनम्र, भावपूर्ण आणि अश्रुपूर्ण श्रद्धांजली.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !