दिवाळीच्या प्रकाशात माहेरची सावली.....!
दिवाळीच्या प्रकाशात माहेरची सावली.....!
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. पण प्रत्येक स्त्रीसाठी, विशेषतः एका लेकीसाठी, दिवाळी हा काळ अधिक भावनिक आणि हृदयस्पर्शी ठरतो. कारण ही ती वेळ असते, जेव्हा ती पुन्हा एकदा "बापाच्या घरची लेक" होते.
माहेर हे केवळ एक घर नसते, तर ते एक भावविश्व असते. जिथे तिच्या अस्तित्वाचा प्रत्येक कोपरा परिचित असतो. जिथे दरवाज्याच्या चर्र आवाजात तिच्या लहानपणाच्या आठवणी दडलेल्या असतात. आणि दिवाळीचं नाव जरी घेतलं गेलं, तरी तिच्या मनात सर्वात आधी आठवतो तो माहेरचा आंगण, आईने सजवलेली रांगोळी आणि वडिलांनी खास तिच्यासाठी आणलेली फटाके-फराळाची पिशवी.
सासर सुखाचं असतं, ते तिचं दुसरं घर असतं. पण तरीही, माहेरसारखी ओढ, माहेरसारखी माया, कुठेच आणि कधीच मिळत नाही. कारण माहेर हे केवळ रक्ताचं नातं नसून, ते प्रेमाचं, आठवणींचं आणि मनाच्या स्पर्शाचं नातं असतं.माहेरी ती 'आई' नसते, ती 'सून'ही नसते… ती असते फक्त एक मुलगी.आणि दिवाळी म्हणजे त्या मुलीला पुन्हा एकदा तिचं स्वत्व गवसण्याचा, तिच्या अस्तित्वाची उजळणी होण्याचा काळ!
दिवाळी जवळ येऊ लागली, की तिचं मन सैरावैरा होतं. लहानपणी खेळलेले खेळ, आईच्या हातचे गोड पदार्थ, फटाके फोडतानाचे क्षण, हे सारे डोळ्यांसमोर उभे राहतात.आज ती स्वतः आई असते, फराळ करत असते, सगळं जबाबदारीने पार पाडत असते, पण आईच्या हातची चव मात्र अजूनही ओठांवर रेंगाळलेली असते.
ती माहेरी परत जाते, ते केवळ स्वतःसाठी नाही… तर लहानपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जगण्यासाठी जाते.
वडिलांच्या हातात आपल्या लाडक्या लेकराला देताना, तिच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळतं कारण तिला त्या प्रेमाचं खरं रूप उमगलेलं असतं.आईचं तीव्र ओढणं, रात्रभर गप्पा, भावंडांसोबत फराळ चोरून खाणं हे सगळं तिच्या मनात खोलवर घर करून बसलेलं असतं. आणि ती आतून आतून या क्षणांची आस धरून असते.
ते काही दिवस का होईना… पण ती पुन्हा ‘बापाची लेक’ होते.पुन्हा तिचा हट्ट चालतो, पुन्हा ती कोणाच्याही भीतीशिवाय रडू शकते, हसू शकते… आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ती तिथं पूर्ण असते.
माहेर आणि दिवाळीचं नातं हे असंच काहीसं अनोखं, हृदयाला भिडणारं आणि कायम लक्षात राहणारं असतं.
सासर कितीही गोड असलं, तरी स्त्रीच्या आयुष्यात 'माहेर' या शब्दाने एक कोपरा सदैव व्यापलेला असतो.
आणि दिवाळी ही त्या कोपऱ्यातली आठवणींनी उजळून निघण्याची, मनभरून आनंद साठवण्याची सुंदर संधी असते."दिवाळी ही प्रकाशाची असते, पण प्रत्येक लेकीसाठी ती तिच्या ‘माहेरच्या सावली’तच पूर्ण होते..
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा