निष्ठा संघर्ष आणि विश्वासाचा चेहरा रवींद्र कंखरे...!
निष्ठा संघर्ष आणि विश्वासाचा चेहरा रवींद्र कंखरे...!
धरणगाव – जळगाव जिल्ह्यातील एक साधं पण तेजस्वी गाव, ज्याच्या मातीत कष्टांची परंपरा आणि जिद्दीचा वारसा लाभलेला आहे. या मातीतच घडलेला एक मेहनती, कर्तृत्ववान आणि निष्ठावान तरुण म्हणजे रवींद्र गोकुळ कंखरे. शून्यातून स्वतःचं स्वतंत्र विश्व उभं करत, आज ते अनेकांसाठी आशेचा किरण ठरले आहेत.
रवींद्र कंखरे यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील शेतीत राबणारे, तर आईने कष्टाची सवय लावणारी. गरिबीची परिस्थिती असली तरी मनात मोठी स्वप्नं आणि ती पूर्ण करण्याची जिद्द नेहमी जागी होती. लहान वयातच आयुष्याच्या कठोर वास्तवाला सामोरं जात त्यांनी ठरवलं की परिस्थिती बदलायची असेल, तर कष्टाशिवाय पर्याय नाही.
आई-वडिलांसोबत शेतीकाम करत करत त्यांनी शिक्षणाची वाट धरली. अभावाच्या काळात कुठली ही तक्रार न करता, प्रामाणिकपणे आणि सातत्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या या प्रवासात चिकाटी, संयम आणि जिद्द यांचाच मोठा वाटा होता.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयुष्य केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता, गावातील तरुणांसाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा निर्धार केला. याच इच्छेतून 'साई व्हॉलीबॉल क्लब, धरणगाव' या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला एक साधं मैदान, काही बॉल्स आणि एक मोठं स्वप्न एवढंच भांडवल होतं. मात्र त्यातून त्यांनी दर्जेदार खेळाडू घडवले, जे आज राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आहेत.
रवींद्र कंखरे यांच्यासाठी हा क्लब फक्त खेळाचं केंद्र नव्हतं, तर तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि संघभावना निर्माण करणारं एक सामाजिक शिक्षणकेंद्र ठरलं.
त्यांचा राजकारणातील प्रवेश नैसर्गिक आणि सच्चा होता. बालपणापासूनच त्यांना शिवसेना पक्षाविषयी आत्मीयता होती. स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि लोकहितासाठी असलेली बांधिलकी यामुळे त्यांची ओळख वेगळी ठरली. त्यांच्या या गुणांवर विश्वास ठेवून, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. गुलाबरावजी पाटील यांनी त्यांची शिवसेनेच्या उमेदवार प्रतिनिधी म्हणून निवड केली.
ही निवड फारच महत्त्वाची होती. उमेदवार प्रतिनिधी ही फक्त नावापुरती भूमिका नसून त्यासाठी प्रशासनाचा गाढा अभ्यास, नियोजन, आणि विश्वासार्हता आवश्यक असते. उमेदवाराच्या संपूर्ण प्रक्रियेत त्याचं प्रतिनिधित्व करणं ही जबाबदारी केवळ विश्वासू व्यक्तीलाच दिली जाते. रवींद्र कंखरे यांनी या जबाबदारीचं योग्य पालन केलं असून, गेल्या चार पंचवार्षिकांपासून ते ही भूमिका विश्वासाने निभावत आहेत.
या काळात त्यांनी प्रशासन, निवडणूक प्रक्रिया आणि जनसंपर्क यांचा सखोल अभ्यास केला आहे. कोणतंही काम असो, त्यांनी नेहमी काटेकोर नियोजन, संयम आणि लोकहिताची भूमिका घेतली. त्यामुळे आज त्यांची ओळख अभ्यासू, निष्ठावान आणि कार्यक्षम प्रतिनिधी म्हणून झाली आहे.
विशेष म्हणजे, कोणतंही पद नसतानाही किंवा कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता, त्यांनी १८७५ बेघर कुटुंबांना घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केले. यातील अनेक कुटुंबांना प्रत्यक्षात घरे मिळालेली असून उर्वरित प्रकरणे प्रक्रियेत आहेत. ही केवळ सामाजिक कार्यवाही नव्हे, तर एक माणूस दुसऱ्यासाठी किती झटू शकतो याचा जिवंत दाखला आहे.
रवींद्र कंखरे यांनी धरणगाव शहरातील विधवा, परित्यक्ता, अपंग, वृद्ध नागरिक आणि गोरगरीब कुटुंबांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जे लाभार्थी या योजनांपासून वंचित होते, त्यांच्या पर्यंत लाभ पोहोचेपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच नेहरूनगर, हनुमान नगर, बेलदार गल्ली, धनगर गल्ली, परीहार चौक, नेताजी रोड, पारोळा नाका या भागांतील नागरिकांना रेशन कार्ड, संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, आयुष्मान भारत योजना, कृषी योजना अशा विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
मा. गुलाबराव पाटील साहेबांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांचा विश्वास मिळवणं ही काही सामान्य बाब नाही. हा विश्वास मिळवण्यासाठी पात्रता, निष्ठा आणि कार्यक्षमता आवश्यक असते. रवींद्र कंखरे यांनी आपल्यातील या गुणांमुळे तो विश्वास सिद्ध केला आहे. म्हणूनच आज ते साहेबांचे विश्वासू प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात.
रवींद्र कंखरे यांचं जीवन केवळ एक प्रेरणादायी कथा नाही, तर संघर्ष, निष्ठा आणि सेवाभाव यांची शिकवण देणारं उदाहरण आहे. त्यांनी केवळ स्वतःचं जीवन उजळवलं नाही, तर अनेकांच्या जीवनात आशेचा प्रकाश आणला आहे.
धरणगावसारख्या ग्रामीण भागातून उभं राहत त्यांनी जे कार्य केलं, त्यातून आज हजारो युवकांना प्रेरणा मिळते. रवींद्र कंखरे हे केवळ एक नाव नाही, तर विश्वासाने प्रज्वलित झालेला दीपस्तंभ आहेत, जो इतरांना मार्ग दाखवतो, ऊर्जा देतो आणि सत्कर्माच्या दिशेने प्रेरित करतो.
© दीपक पवार (संपादक) – खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा