स्वतःपुरतं जगणं ही लोकांना खटकतं...!


स्वतःपुरतं जगणं ही लोकांना खटकतं...!

आपल्या आयुष्यात आपण एकच गोष्ट जपण्याचा प्रयत्न करतो शांतता.ना कुणावर ओरडायचं, ना कुणाच्या वाटेत जायचं.ना कुणाचं वाईट चिंतन करायचं, ना कुणाला दोष देत बसायचं.फक्त स्वतःची वाट निवांतपणे चालायची, आपली माणसं जपायची, आणि आपल्या स्वप्नांसोबत प्रामाणिक राहायचं. एवढंच!

पण हेच साधेपण, ही शांतता, काही लोकांना सहन होत नाही.आपण कुणाच्याही अध्यात-मध्यात नसताना ही, लोकांना आपली उचापत वाटते.आपण गप्प राहिलो, तर म्हणतात, “घमेंडखोर आहे.”हसलो, तर म्हणतात, “दांभिक आहे.” सहन केलं, तर “कमकुवत” म्हणतात,
आणि जर उत्तर दिलं, तर “उद्धट” ठरवतात.

एखाद्याचं संयमी वागणं, त्याचं स्वतःपुरतं मर्यादित राहणं, ही गोष्ट अस्वस्थ मनांना बनावटी वाटते.
त्यांना माणूस गोंधळात सापडलेला, बोलघेवडा, वरवरचा वाटतो. तोच ‘सामान्य’ भासतो.पण जो त्यांच्या साच्यात बसत नाही, त्यांच्या अपेक्षांप्रमाणे वागत नाही.तो त्यांच्या दृष्टीने लगेच संशयास्पद ठरतो.

अशा वेळी मनात प्रश्न उभे राहतात.असं काय आहे त्यांच्या मनात, की दुसऱ्याच्या शांततेत त्यांना अस्वस्थता वाटावी?एखादा माणूस मनमोकळं हसतो, तर त्यांच्या नजरेत चिडचिड झळकते.कोणी एखादा आपल्या मार्गाने, गप्प राहून, कोणालाही न दुखावता वाटचाल करतो,तेव्हा त्याचं वागणं त्यांना खोटं, बनावटी का वाटतं?

या सगळ्याचं एकच साधं उत्तर आहे.हे लोक स्वतःलाच समजून घेतलेलं नसतं.त्यांचं अंतर्मन अस्वस्थ असतं,
त्यांच्या विचारांत गोंधळ असतो,आणि म्हणूनच दुसऱ्याच्या शांततेत त्यांना अडचण वाटते.

त्यांच्या रिकाम्या आयुष्याला अर्थ द्यायचा, म्हणून ते दुसऱ्याच्या जगण्यात डोकावतात.दुसऱ्याचं वागणं, त्याच्या कृती, त्याची शांतता यावर शंका घेतात, टीका करतात.हेच त्यांच्या असंतोषाचं आणि आत्मअसमाधानाचं प्रकट रूप असतं.

पण म्हणून आपण आपली शांती गमवायची का?

नाही!आपण वादात अडकायचं नाही.आपण निरर्थक स्पष्टीकरणं देत बसायचं नाही.आपण आपल्या
ओळखीची मोडतोड कुणाच्या मतानुसार करायची नाही.
आपण फक्त आणि फक्त आपणच राहायचं.

कारण...नावं ठेवणारे हजार भेटतील,पण नाव कमवणारे मोजकेच असतात.आणि आपण त्यातले आहोत. हेच आपल्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने यश आहे.

शेवटी इतकंच कोणी काहीही म्हटलं,तरी मनात जर शांततेची सावली असली, तर बाहेरच्या वादळांना घाबरण्याचं कारणच राहत नाही.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !