मनातील देव हरवू नये...!


मनातील देव हरवू नये...!

आपण देवासमोर उभे राहतो तेव्हा अनेकदा मागणी करतो सुख, शांती, आरोग्य, यश. पण खरी भक्ती ही फक्त मागण्यात नसते, तर त्या मागणीनंतर आपल्या वागणुकीत असते.

देवळात जाऊन नमस्कार करून आपण देवासमोर नतमस्तक होतो, पण देवळाबाहेर येताच मनातली नम्रता टिकते का? आपण किती वेळा स्वतःला विचारतो. देवाकडे पाहताना मी कसा वागत आहे?

हीच खरी चाचणी आहे. आपल्या श्रद्धेची, आपल्या अंतर्मनातील देवपणाची.कारण माणूस फक्त शब्दांनी ओळखला जात नाही, त्याचे वर्तनच त्याचा खरा परिचय सांगते. आपण काय बोलतो, लोक विसरतात, पण आपण कसे वागतो, ते लक्षात राहते.

चांगले विचार आणि चांगली कर्म हीच खरी पूजा आहे. ती केली की तुम्ही मंदिरात गेलो नाही तरी चालेल. पण मनात अंधार, द्वेष, खोटेपणा, स्वार्थ असेल, तर जगातील कितीही भव्य मंदिरे असली तरी काही उपयोग नाही.कारण देव दगडात नसतो... देव असतो आपल्या अंतःकरणात.पण जर अंतःकरण गढूळ आणि अहंकाराने भरलेले असेल, तर देव तिथे कसा टिकेल?

आपले खरेपण फक्त आपल्या अंतरात्म्यालाच माहिती असते. लोकांसमोर आपण कितीही छान रूप दाखवले तरी आतली खोटेपणाची सळकळी आपल्याला आणि परमात्म्याला कधीच फसवू शकत नाही.
म्हणून, जपायचं असेल तर दोन गोष्टी जपा.मनाचं निरागस बालपण आणि अंतःकरणातील शुद्ध
देवपण.जेव्हा मन निरागस असतं, तेव्हा देव आपोआप जवळ वाटतो. त्याला सजावटीच्या पूजांची गरज नसते, त्याला फक्त एक गोष्ट हवी असते सच्चं मन.

आजचा माणूस यशाच्या, स्पर्धेच्या आणि सत्तेच्या शर्यतीत इतका अडकला आहे की आपलं अंतरंग विसरतो आहे. मनातील देवपण झाकोळलं जात आहे. चेहऱ्यावर हास्य असलं तरी डोळ्यांतून निरागसतेचा प्रकाश हरवला आहे.

जगात खूप मंदिरे आहेत. सोन्याची, संगमरवरी, भव्य आणि सुंदर. पण सगळ्यात पवित्र मंदिर माणसाचं मन आहे. आणि त्या मंदिरात जर एक छोटासा दिवा  चांगुलपणाचा, दयाळूपणाचा, सत्याचा लावलेला असेल, तरच आपण खरं भक्त आहोत.

तो दिवा कायम तेजस्वी ठेवणं हेच जीवनाचं खरं साधन आहे.कारण एकदा मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण हरवलं, तर माणूस म्हणून आपण फक्त चालत फिरतला आभास होतो.

म्हणून...देवासमोर झुकण्यापेक्षा अंतःकरणातील देव जपणं महत्त्वाचं आहे.कारण देव कुठे आहे हे विचारण्या आधी,आपण त्यासाठी जागा दिली आहे का, हे तपासणं गरजेचं आहे.
 
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !