ओळख मनाची.....!


ओळख मनाची.....!

माणूस या पृथ्वीवर जन्माला येतो तेव्हा तो निरागस असतो.मनाने निर्मळ, विचारांनी पवित्र. त्याच्या मनात द्वेष नसतो, वाईटपणा नसतो, फसवणूक नसते. पण जशी जशी वेळ पुढे सरकत जाते, तसं जीवन त्याला वेगवेगळ्या वाटांवर उभं करतं. काही वाटा सोप्या असतात, काही खडतर, काही अंधारलेल्या. आणि त्या वाटांवर चालताना कधी कधी माणूस आपल्या इच्छेने नव्हे, तर परिस्थितीच्या ओढीने चुकीचं वागतो.

माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही.त्याचं मन चुकीचं नसतं, पण कधी परिस्थिती, कधी समाज, कधी लोकांची अपेक्षा आणि कधी काळाची वळणं त्याला अशा दिशेला नेतात जिथे चुकाही घडतात.आणि मग लोक त्या चुकांवर निर्णय देतात, पण त्या चुकांमागचं सत्य समजून घेण्याचा प्रयत्न फार थोडे करतात.

जगात प्रत्येक जण आपल्या परीने योग्यच वागत असतो. पण जेव्हा परिस्थितीचा ताण येतो, तेव्हा काही वेळा आपल्याला आपल्या मनाविरुद्ध वागावं लागतं. आपण चुकीचे नसतो, पण परिस्थिती चुकीची असते.पण अशा वेळीही जो माणूस आपल्या शब्दाला जागतो, आपल्या मूल्यांवर ठाम राहतो, आणि शेवटपर्यंत साथ देतो. तोच खरा माणूस ठरतो.

वेळ चांगली असो वा वाईट, नाती टिकवणं, दिलेला शब्द पाळणं आणि कोणाचं मन न दुखवणं हीच खरी ओळख आहे माणसाची.आजच्या या वेगवान जगात, जिथे लोक शब्द देतात आणि क्षणात विसरतात, तिथे जो व्यक्ती आपल्या वचनाला प्राणासमान जपत असतो, त्याचं आयुष्य परिस्थिती कितीही उलट-सुलट झालं तरी तेजानं उजळून निघतं.

ओळख म्हणजे फक्त नाव नाही, ती म्हणजे आपली मूल्यं, आपली प्रामाणिकता, आपली माणुसकी.ती ओळख जेव्हा वेळेच्या कसोटीवर उतरते, तेव्हा तीच आपलं भविष्य ठरवते.कारण नशीब लिहिणारा काळ असतो, पण ते नशीब उजळवणारा आपल्या मनाचा स्वभाव असतो.

कधी कधी आपण हरतो, तुटतो, आपल्यावर अन्याय होतो, पण जर आपण आपल्या माणुसकीला जिवंत ठेवलं, तर आपण कधीच हरत नाही. कारण परिस्थिती नेहमी बदलते, पण खरा माणूस कधीच बदलत नाही.
जो व्यक्ती एका दिलेल्या शब्दासाठी आयुष्यभर उभा राहतो, जो नात्याला शेवटपर्यंत निभावतो, आणि जो मनाच्या पवित्रतेवर विश्वास ठेवतो.त्याचं आयुष्य कोणत्याही परिस्थितीत पराभूत होऊ शकत नाही.

शेवटी इतकंचजीवनात परिस्थिती कितीही कठीण आली,लोक कितीही गैरसमज करून घेतले,तरी स्वतःचं मन स्वच्छ ठेवा.कारण चुकीची वेळ संपते, पण चांगली ओळख कायम राहते.

ज्याचं मन खरं आहे, ज्याचे शब्द सत्य आहेत,आणि जो शेवटपर्यंत आपल्या माणसांच्या पाठीशी उभा राहतो.त्याचं नाव काळाच्या ओघातही अमर राहतं.
कारण ओळख ही परिस्थितीने नाही, तर मनाने घडते;
आणि तीच ओळख, शेवटी तुमचं भविष्य ठरवते. 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !