प्रेमाची सुरुवात स्वतःपासून.....!

प्रेमाची सुरुवात स्वतःपासून.....!

खरंच… आपल्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करावं, आपली काळजी घ्यावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण प्रेम हे मागून मिळत नाही.ते देऊन मिळतं.कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्या जखमा पाहाव्या, आपल्या आनंदाला मिठी मारावी, ही अपेक्षा जशी खरी आहे, तशीच एक सत्य गोष्ट आपण विसरतो जगाला तुम्ही काय देता, तेच जग तुम्हाला परत देतं.

आपल्याकडून इतरांना जेव्हा खरी आपुलकी मिळते… नुसती शब्दांची नाही, तर मनातून आलेली ऊब… तेव्हा एखाद्या माणसाच्या डोळ्यात अचानक विश्वास उगवतो.
कोणी तुमच्यात स्वतःसाठी जागा पाहू लागतो.कोणी तुमच्या जवळ राहताना सुरक्षित वाटू लागतो.हीच तर प्रेमाची सुरुवात असते.

आपण प्रेमाची वाट बघतो, पण स्वतःच्या मनात कधी झरा वाहू देत नाही.आपुलकीचा नुसता आव आणला की ते दिसून येतं;कारण खोट्या ऊबेचा स्पर्श कधीही हृदयापर्यंत पोचत नाही.मात्र, मनातून ओसंडून आलेली माया शब्दांशिवाय ही जाणवते,दूरूनही स्पर्श करते,
आणि एकटा असलेल्या जीवाला जगण्याची नवीन उमेद देते.

इतरांची काळजी घेणं म्हणजे स्वतःला नेहमी मागे ठेवणं नाही.तर, मन मोठं करणं आहे.एखाद्याच्या दुःखात हात धरून शांतपणे उभं राहणं आहे.कोणी थकल्यावर त्यांच्या मनाला थोडा विसावा देणं आहे.आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या आयुष्यात आपण "होतो" हा विश्वास दिला जाणं आहे.

असं निस्वार्थ प्रेम देणारे हात आज कमी आहेत,म्हणून असे हात परत फिरून आपल्या दिशेने येतात.कारण प्रेमाचं एक सुंदर वैशिष्ट्य आहे.ते कधीच वाया जात नाही.ते आपण दिलं तरी कुठेतरी जपलं जातं,साठतं, वाढतं…आणि योग्य वेळी, योग्य माणसाकडून
आपल्याकडे परत येतंच.

म्हणूनच जर एखाद्यानं तुमच्यावर हृदयापासून प्रेम करावं असं वाटत असेल,तर प्रथम स्वतःच्या हृदयात ती माया उगवू द्या.आपुलकीचं सोंग नको खरं प्रेम द्या.कारण जिथून प्रेम वाहतं,तिथेच प्रेम परत येतं…आणि मग आयुष्य खरंच सुंदर होतं.

©दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !