आदिवासी समाजक्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा
आदिवासी समाज क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त लेख
आदिवासी समाजक्रांतीचे
जनक भगवान बिरसा मुंडा
आदिवासी समाज क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहातू या ग्रामामध्ये झाला.ते मुंडा आदिवासी जमातीचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करमी हातू होते. ते आदिवासी हक्क, स्त्री-स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा यासाठी लढा देणाऱ्या पहिल्या आदिवासी नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
त्यांचे शिक्षण जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये झाले.शाळेत मुंडा आदिवासींबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले होते , म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले.त्यांनी हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी धर्मातील चांगली तत्त्वे एकत्रित करून 'बिरसाईट' (Birsaites) या नव्या धर्माची स्थापना केली.
यामुळे त्यांनी मुंडा जमातीत एकता निर्माण केली आणि ते 'भगवान बिरसा' आणि 'धरती अब्बा' (पृथ्वीचा पिता) म्हणून ओळखले जाऊ लागले.
सन : १८५७ च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या.इंग्रजांच्या गुलामगिरीतून आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक चळवळ सुरू केली.त्यांनी "अबुआ देशुम अबुआ राज" (आमच्या देशात आमचे राज्य) चा नारा दिला.बिरसांनी पुकारलेल्या या मुक्ती आंदोलनाला मुंडारी भाषेत 'उलगुलान' (विद्रोह/महान गदारोळ) असे म्हणतात.त्यांनी जंगल कायद्याविरुद्ध तसेच जमीनदारी व्यवस्था आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठा लढा उभारला होता.दि.२६ ऑगस्ट १८९५ रोजी इंग्रजांनी त्यांना पहिल्यांदा अटक केली आणि दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. दि .३० नोव्हेंबर १८९७ रोजी त्यांची सुटका झाली होती.कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी सेवादलाची स्थापना केली आणि गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडाराज्य स्थापन करण्याच्या शपथा घेतल्या. दि .२५ डिसेंबर १८९९ पासून त्यांनी इंग्रज अधिकारी, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्या विरोधात प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. दि .९ जानेवारी १९०० रोजी खुंटी जिल्ह्यात डोंबारी बुरूज (टेकडी) येथे झालेल्या संघर्षात अनेक बिरसाई शहीद झाले.इंग्रजांनी कुटनितीचा वापर करून दि .३ फेब्रुवारी १९०० रोजी त्यांना पुन्हा अटक केली.रांची येथील तुरुंगात इंग्रजांनी केलेल्या अतोनात छळामुळे दि. ९ जून १९०० रोजी ते शहीद झाले. मृत्यूचे अधिकृत कारण 'कॉलरा' सांगितले गेले, परंतु अनुयायी आजही याला रहस्यमय मानतात. तेव्हा त्यांचे वय अवघे २५ वर्षे होते.बिरसा यांच्या निधनानंतर इंग्रजांना छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट मंजूर करून आदिवासींचे जमिनीवरील हक्क मान्य करावे लागले.रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ त्यांची समाधी असून तेथे त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे.
आदिवासी समाज क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या १५० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥
बीरसाजी मुंडा । आज जन्मदिन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ॥
समता भूषण पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती :८०८७७४८६०९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा