जिथं प्रगती असते,तिथं जळण्याची सावलीही असते....!


जिथं प्रगती असते,तिथं जळण्याची सावलीही असते....!

कधी कधी आपल्या आजूबाजूचे लोक अचानक शांत होतात. कालपर्यंत ज्यांनी आपल्याशी हसत-खेळत बोलावं, तेच लोक अचानक दुरावल्यासारखे वाटतात. त्यांचे शब्द कमी होऊ लागतात आणि नजर चुकवली जाऊ लागते. तेव्हा मनाच्या तळाशी कुठेतरी जाणवतं आपल्या प्रगतीची चुणूक त्यांना टोचू लागली आहे. आपलं उन्नतीकडे जाणारं पाऊल त्यांच्या मनात न बोलता चीड निर्माण करत असतं.

अशा लोकांना स्वतःचं काही साध्य होत नाही, म्हणून त्यांचं मन भटकत राहतं. त्यांच्या असंतोषाला कुठे तरी वाट काढायची असते, म्हणून ते तुमच्या मानसिक संतुलनाशी खेळ करण्याचा प्रयत्न करतात. कधी किरकोळ कारणांवरून भांडण शोधतात, कधी शब्दांचा गोंधळ उभा करतात, तर कधी वायफळ आरोप करून स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या जीवनात उद्योग नसतो, ध्येय नसतं, म्हणून ते इतरांना खाली खेचून स्वतःची उंची मोजण्याचा अपयशी प्रयत्न करत राहतात.

स्वतःची प्रगती थांबलेली असताना दुसऱ्याची प्रगती पहाणं अनेकांना सहन होत नाही. रात्री डोळा लागायला त्रास होण्याइतकी त्यांना तुमची भरारी खुपत असते. त्यामुळे ते शेजाऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल काहीही बोलून एक खोटा, क्षणिक आनंद मिळवतात. तो आनंद त्यांच्या रिकाम्या मनाचा तात्पुरता मलम असतो; कारण खरा आनंद त्यांना स्वतःच्या प्रयत्नांतून नाही, तर दुसऱ्याच्या अडथळ्यात शोधावा लागतो.

पण अशा लोकांच्या टोचणाऱ्या शब्दांना, जळजळीत नजरा आणि कटूपणाला तुम्ही उत्तर देण्याची गरजच नाही. त्यांच्या वागणुकीत त्यांच्या वेदनेचे, असूयेचे आणि असमर्थतेचे प्रतिबिंब असते. तुमच्या मनाने ते
ओळखायचं, पण त्यांच्यामुळे स्वतःचा वेग कमी करायचा नाही. कारण जगातल्या प्रत्येक जळणाऱ्या मनाला शांत करणारा एकच उपाय आहे.आपली प्रगती सतत वाढवत राहणे.

तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कष्ट करत राहा, आणि शांतपणे पुढे जात राहा. तुमची प्रत्येक छोटी किंवा मोठी उंची त्यांच्या जळण्यावरचं अप्रतिम औषध ठरते. एक दिवस तोच समाज पाहील की तुम्ही न बोलता, न भांडता, कुठल्याही वादात न अडकता स्वतःच्या कर्तृत्वाने किती पुढे गेलात. तेव्हा त्यांच्या मनातल्या कुरकुरीला आपोआप उत्तर मिळून जाईल.

आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणं हीच सर्वात मोठी ताकद असते. स्थिरता, आत्मविश्वास आणि सक्षमता ही अशी शस्त्रं आहेत जी कुणालाही न दुखावता जळणाऱ्यांना नमवतात.पैसा म्हणजे केवळ संपत्ती नव्हे; तो स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्वतःवरचा विश्वास वाढवणारा आधार असतो.आणि हा आधार
मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत जळणाऱ्यांना सर्वात जास्त अस्वस्थ करते.

शेवटी, जळणारे बदलले नाहीत तरी हरकत नाही. तुम्ही मात्र थांबू नका. तुमचं यशच त्यांच्याकडे देण्यासारखं सर्वात शांत,सर्वात प्रभावी आणि सर्वात सुंदर उत्तर
असतं. तुम्ही उजेडासारखे उजळत राहा; सावलीत राहणाऱ्यांना त्या प्रकाशाची जाणीव नेहमीच होते…आणि तेच त्यांच्या जळण्याचं खरे औषध ठरतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !