मनःशांती ते मनोबल धरणगावात घडलेला रूपांतराचा क्षण...!
मनःशांती ते मनोबल धरणगावात घडलेला रूपांतराचा क्षण...!
धरणगावच्या विश्वकल्याणी भवनात २१ तारखेला एक असा क्षण उगवला, ज्याने शेकडो युवकांच्या मनामध्ये धैर्याचा दिवा पुन्हा प्रज्वलित केला. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, धरणगाव आणि युवा प्रभाग, माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “Fear Less, Live More डर के आगे जीत है” हा प्रेरणादायी कार्यक्रम म्हणजे भीतीच्या पलीकडे असलेल्या अनोख्या शक्तीचा अनुभव प्रत्येकाला देणारा एक आध्यात्मिक सोहळा होता.
सकाळच्या प्रकाशाप्रमाणे शांत पण ऊर्जा देणारे वातावरण सभागृहात पसरले, जेव्हा मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रह्माकुमार रूपेशभाई (माउंट आबू), ब्रह्माकुमारी नीता दिदी (धरणगाव सेवाकेंद्र), दीपक जाधव (चेअरमन, लिटल ब्लॉसम स्कूल), ज्योती जाधव (प्राचार्य, लिटल ब्लॉसम स्कूल),सुधाकर मोरे (मुख्याध्यापक,इंगजी विद्यालय,साळवे) कडू महाजन पत्रकार,लोकनायक न्यूज चे संपादक जितेंद्र महाजन, संतोष पवार (पोलिस उपनिरीक्षक) तसेच बडगुजर साहेब (पोलिस उपनिरीक्षक) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढलीच, पण युवकांसाठी आशेचे, मार्गदर्शनाचे आणि आत्मविश्वासाचे दार अधिकच उघडले.
सभागृहात बसलेल्या तरुणांना जणू एखाद्या अनुभवी मार्गदर्शकाचीच वाट पाहत होती.आणि त्या क्षणी मंचावर आले ब्रह्माकुमार रूपेशभाई. त्यांच्या शांत स्वभावात, प्रभावी संवादात आणि हृदयाला भिडणाऱ्या उदाहरणांतून जणू भीतीच्या धुक्यात अडकलेल्या प्रत्येक मनाला नवा प्रकाश मिळत होता.त्यांनी सांगितलेले शब्द मनात कोरून ठेवावे असे होते.“अडचणींपासून पळणं नव्हे… त्यांना सामोरं जाणं हीच खरी जिंकण्याची सुरुवात आहे.”
जीवन सतत परिक्षा घेते, काही क्षणी रडवते, काही क्षणी थांबवते; परंतु संघर्ष न करणाऱ्या व्यक्तीला जीवनात काहीही मिळत नाही, असा त्यांनी ठाम संदेश दिला. संकटांना सामोरे जातो, त्या क्षणीच आपली अंतरंग शक्ती जागृत होते.धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मकता अधिक बळ मिळवतात. त्यांनी युवांना सांगितलं की, अपयश हा शेवट नसतो; ते पुढील विजयाची तयारी असते.
राजयोग ध्यानाच्या सरावाने मन अधिक शांत, बुद्धी अधिक स्वच्छ आणि व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत होतं हा अनुभव युवकांना कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष ध्यानातून मिळाला. सभागृहातील शांततेतून उठणारी प्रत्येकाची श्वासांची लय जणू आत्मविश्वासाला नवा आकार देत होती.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि मार्गदर्शन ब्रह्माकुमारी नीता दिदी यांनी अत्यंत प्रेम, समर्पण आणि आध्यात्मिक उर्जेने केले. त्यांच्या सौम्य नेतृत्वाने कार्यक्रमाची सांगता नव्या प्रेरणेने झाली. उपस्थित सर्व मान्यवर, स्वयंसेवक आणि सहभागी युवकांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांच्या मनात एक भावना स्पष्टपणे उमटली.
“आज जीवनाचं नवं पान उघडलं… भीती कमी झाली आणि आशेचा प्रकाश वाढला.”
कठीण परिस्थितींचा सामना करणाऱ्या लोकांचा विजय केवळ त्यांचाच नसतो.तो समाजाचा, पुढच्या पिढ्यांचा, तसेच प्रेरणा शोधणाऱ्या प्रत्येकाच्या मनाचा असतो. रूपेशभाई यांनी सांगितलेल्या प्रत्येक वाक्यातून युवकांना एकच संदेश मिळाला.“जे धाडस करतात, तेच दिशा शोधतात…आणि जे संघर्ष करतात, तेच जग जिंकतात!”
धरणगावातला हा कार्यक्रम केवळ एक उपक्रम नव्हता,
तो होता.मनाच्या पायवाटेवर लावलेला आत्मविश्वासाचा दिवा,भीतीच्या अंधाराला वितळवणारा प्रकाश,आणि नव्या सुरुवातीचं अनोखं निमंत्रण.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा