सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान पूर्वाचा प्रामाणिकपणा.....!
सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान पूर्वाचा प्रामाणिकपणा.....!
धरणगाव तालुक्यातील जांभोरे हे एक लहान, शांत आणि साधेपणाची ओळख जपणारं गाव आहे. या गावाची खरी श्रीमंती दागिन्यांत किंवा रुपयापैशांत नाही; ती दडलेली आहे गावातील लोकांच्या स्वभावात, त्यांच्या स्वच्छ मनात आणि संस्कारांमध्ये. जांभोरे गावात सोन्याची किंमत त्याच्या वजनाने नाही, तर प्रामाणिकपणा, निस्वार्थपणा आणि चांगुलपणाच्या तेजाने मोजली जाते.
याच गावातील अकरावीमध्ये शिकणारी कु.पूर्वा निरंजित गुजर हिने अलीकडेच दाखवलेला प्रामाणिकपणाचा आदर्श संपूर्ण गावासाठी अभिमानाची नवीन शिदोरी ठरली. जांभोरे गावातील गल्लीतील रहिवासी सौ.शोभा दीपक महाजन यांच्या कानातील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल हरवले होते. हे टोंगल हरवल्यामुळे त्यांच्या मनात काळजीचं सावट दाटलेलं होतं. सोनं हरवलं म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नाही, तर मनातील अस्वस्थता, धाकधूक आणि सतत छळणारी चिंता हाच अनुभव त्यांच्या जीवनात आला होता.
अचानक नियतीने सुंदर वळण दिलं. घरी जाताना पूर्वाला रस्त्यावर हे सोन्याचे टोंगल सापडलं. त्या क्षणी तिच्या मनात कोणताही मोह, शंका किंवा स्वार्थ आले नाही. तिच्या मनाने फक्त एकच सांगितलं, “हे कोणाचं तरी आहे… ते परत करणं माझी जबाबदारी आहे.” या निरागस पण ठाम विचारातच तिच्या प्रामाणिकपणाचा खरा सुवर्णकांत दडलाय.
पूर्वाने गावात चौकशी करून टोंगल कोणाचं आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. चौकशीनंतर ती थेट शोभाताईंच्या घरी पोहोचली. हातात सोन्याचे टोंगल आणि चेहऱ्यावर नम्रतेचा भाव घेऊन ती दारात उभी राहिली आणि शांतपणे म्हणाली, “ताई, हे तुमचंच असावं… मला रस्त्यावर सापडलं.”
त्या क्षणी शोभाताईंच्या डोळ्यांत आलेले अश्रू केवळ सुटकेचे नव्हते; ते होते चांगुलपणाबद्दलची कृतज्ञता, संस्कारांची जाणीव आणि अशा मुलीवरचा अभिमान, जी सोन्याचा दागिना हातात असूनही मनाने सोन्यासारखी शुद्ध राहिली. पूर्वाच्या या कृतीने शोभाताईंच्या मनातील ताण निवळला आणि गावातल्या प्रत्येकाच्या मनात “प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे” ही खात्री अधिक दृढ झाली.
आजच्या काळात, जिथे छोट्याशा फायद्यासाठीही लोक चुकीचा मार्ग स्वीकारतात, तिथे इतक्या लहान वयात एवढा निस्वार्थ निर्णय घेणे खरोखरच अपवादात्मक आहे. पूर्वाने फक्त हरवलेला दागिना परत केला नाही, तर हरवलेला विश्वास देखील परत दिला. तिच्या या कृतीने जांभोरे गावाची ओळख आणखी उजळून निघाली आहे.
पूर्वाचे आई-वडील, शिक्षक आणि संपूर्ण गाव आज तिच्यावर अभिमानाने भरून गेले आहेत. कारण संस्कारांची खरी ओळख शब्दांतून नाही, तर कृतीतून प्रकट होते. पूर्वाच्या या कृतीने तिच्या मनातील चांगुलपणा किती तेजस्वी आहे हे सर्वांना जाणवलं.
पूर्वा, तुझा हा सुवर्ण क्षण आमच्यासाठी प्रेरणेचा दीप आहे. तुझ्या स्वच्छ, निर्मळ मनाचा प्रकाश असाच चमकत राहो. तुझ्या उज्ज्वल भविष्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
© दीपक पवार (संपादक) – खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा