सत्तेच्या सावलीत हरवलेला गावाचा उजेड....!
सत्तेच्या सावलीत हरवलेला गावाचा उजेड....!
गाव… मातीचा गंध, शेतांचा श्वास, श्रमाची पूजा आणि मनाची निरागसता. पण या निरागसतेच्या आकाशावर काळ्या ढगांसारखी काही मुठभर माणसांची स्वार्थाची सत्ता झाक बसवून बसली आहे. विकासाच्या आशेने स्वप्नं उभी करणाऱ्या या गावांमध्ये आज एक अदृश्य जखम दिवसेंदिवस खोल होत चालली आहे.
गावासाठी मिळणारा प्रत्येक निधी, प्रत्येक योजना, प्रत्येक आश्वासन गावकऱ्यांसाठी नसून काही “विशेष” घरांसाठी आरक्षित असल्याचा अनुभव सर्वत्र जाणवू लागला आहे. कारण या योजना गावाला नव्हे… तर “मी आमदाराचा माणूस” अशा नावाने गर्वाने मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खिशात प्रथम पोहोचतात. उरलेलं गावासाठी ते ही फक्त कागदावर.
गावात एखादं सरकारी काम आलं की त्याच्या पहिल्याच दिवशी ठेकेदाराला घरी बोलावून कमिशन ठरवला जातो. विकासाचं काम सुरू होण्याआधीच पैशांचा हिशेब पूर्ण होतो… आणि म्हणूनच गावात उभे राहतात.अर्धवट गटारी, दोन पावसात वाहून जाणारे रस्ते, पाण्याच्या अपूर्ण योजना आणि सांगायला लाज वाटावी असा दर्जाहीन सरकारी कारभार.
गावात मात्र या ढिसाळ कामांची किंमत गावकरी भरत असतात.मुलांना शाळेत जाताना चिखलातून वाट काढावी लागते, शेतकऱ्याला रस्त्याच्या खड्ड्यात ट्रॅक्टर अडकतो, तर एका आईला स्वच्छ पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.
पण हे दुःख, ही घुसमट गावकऱ्यांच्या आवाजात दिसते, तरीही शब्दात उमटत नाही.कारण प्रत्येक जिभेला जखडणारा एकच भयकंठा आहे “तो आमदाराचा माणूस आहे… त्याला काही बोलू नका.”
या भीतीत गावकऱ्यांचा स्वाभिमान हरवतो, विकासाचा हक्क हरवतो, आणि लोकशाहीची खरी ताकदही हरवते.
आणि दुसरीकडे, ज्यांच्या हातात सत्ता नाही पण सत्ता ‘वापरण्याचा विशेषाधिकार’ आहे, त्यांच्या घरात दिव्यांची रोषणाई झळकत राहते. गावाचे स्वप्न मात्र अंधारात.
पण या सर्वांपेक्षा जास्त वेदना देतं ते एक सत्य गावाच्या नावाने मिळणारा विकास गावापर्यंत पोहोचतच नाही.
तो पोहोचतो फक्त त्या काही घरांपर्यंत, जिथे सत्तेचं स्टँप-पेपर बनून “मी आमदाराचा माणूस”हा शब्दच पावतीसारखा वापरला जातो.
आज प्रत्येक आई, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण मूकपणे प्रार्थना करतो.“कधी तरी ही साखळी तुटेल… कधी तरी या स्वार्थाच्या भिंती ढासळतील… आणि कधी तरी गावाचा खरा विकास पुन्हा गावकऱ्यांच्या हाती येईल.”
ही आशा आहे, हीच वेदना आहे आणि हीच हाक आहे.
गावाला विकास हवा आहे… न कि सत्तेच्या नावावर जगणारे कार्यकर्ते.
हे बदलणं आवश्यक आहे.नाहीतर उद्या गावात उरणार नाही ना मातीचा सुगंध, ना मेहनतीची किमया,फक्त सत्तेच्या सावलीत घुसमटलेला विकास… आणि तुटलेली स्वप्नं.काही गावात चांगले ही कार्यकर्ते आहेत पण बोटावर मोजण्या इतकेच.....
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा