अपमानाचे उत्तर यशाने द्या...!
अपमानाचे उत्तर यशाने द्या...!
तुमचा अपमान…ही भावना शब्दांत मावत नाही. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतं, तुमच्यावर हसतं, तुमचं स्वप्न छोटं मानतं तेव्हा मनात एक असह्य टीस उठते. त्या क्षणी काय बोलावं, कसं उत्तर द्यावं हे सुचत ही नाही. पण खरी गोष्ट हीच आहे.अपमानाचं उत्तर त्वरित शब्दांनी दिलं, तर ते क्षणापुरतंच राहतं; पण शांतपणे, संयमाने दिलेलं यशाचं उत्तर आयुष्यभर लक्षात राहतं.
लोकांनी केलेला अपमान मनात ठेवायचा, पण राग म्हणून नाही.जिद्द म्हणून.कारण जेव्हा लोक तुमच्यावर हसतात, तेव्हा ते तुम्हाला थांबवू पाहत नाहीत… ते तुमच्याकडून भीती बाळगतात. तुमच्या क्षमतेची त्यांना जाणीव असते; म्हणूनच ते त्यावर सावली टाकण्याचा प्रयत्न करतात.
पण तुम्ही मात्र शांत राहा.शब्दांनी नाही, कृतीने उत्तर द्या.
त्यांच्या हसण्याला मनात साठवा, पण दुखापत म्हणून नाही.तर इंधन म्हणून.आपलं ध्येय ठरवा,आणि त्या दिशेने चालत राहा. हळूहळू, सातत्याने, संयमानं. कारण जिंकणाऱ्यांचा आवाज कधी मोठा नसतो.तो प्रभावी असतो.
एक दिवस असा येतो, जेव्हा तुम्ही यशाच्या उंचीवर उभे असता.आणि त्याच लोकांची नजर तुमच्याकडे बदललेली दिसते
काल जे हसत होते, आज तेच तुमचं कौतुक करतात.
जे अवहेलनाच करत होते, तेच तुमच्यासमोर आदरानं नतमस्तक होतात.जे अपमान करत होते, तेच तुमच्या पायाशी बसून तुमच्या जिद्दीची कथा इतरांना सांगतात.
यश हे असं उत्तर असतं.कुणालाही न दुखावता दिलेलं सर्वात कठोर उत्तर.कुणालाही न बोलता सांगितलेलं सर्वात प्रभावी सत्य.आणि अपमान करणाऱ्यांना त्यांच्या चुकीचं जाणवून देणारं सर्वात मोठं दर्पण.
म्हणूनच अपमान विसरू नका, पण राग म्हणून जपू नका.त्याला तुमची ओळख बनू देऊ नका, पण प्रेरणा नक्की बनवा.कारण अपमानाचा सर्वात सुंदर बदला म्हणजे बदला नव्हे तो म्हणजे तुमचं यश.
शेवटी एकच वाक्य अपमानाचं उत्तर देण्याची वेळ येतेच…पण ते शब्दांनी देऊ नका.ते तुमच्या उंच भरारीनं द्या.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा