अश्रूंमध्ये जपलेली मैत्री....!
अश्रूंमध्ये जपलेली मैत्री....!
मैत्री म्हणजे फक्त हसणं, मजा करणं, खोड्या काढणं एवढंच नसतं… मैत्री म्हणजे मनाचे भार एकमेकांसमोर हलके करणं, न बोललेलं समजून घेणं आणि कधी अश्रूंमधूनही आपल्या माणसाला घट्ट धरून ठेवणं.
कधी विचार करा…जर एखादा माणूस मैत्रीत ही रडला असेल, तर त्याच्या मनात त्या नात्याची किती खोलवर जागा असेल! अश्रू म्हणजे कमजोरी नाही.ती
प्रामाणिकतेची शिक्कामोर्तब भाषा असते.
असा माणूस रडतो कारण तो नात्याला तितकं महत्व देतो,तो भावनांना मनात दाबू शकत नाही,त्याला मैत्री तुटण्याची कल्पना सुद्धा असह्य वाटते,आणि त्याच्यासाठी "मित्र" ही फक्त संज्ञा नसून एक जिवंत भावना असते.
जेव्हा एखादा मित्र आपल्या मनातील वेदना, भीती, प्रेम, काळजी ह्यांना अश्रूंमार्फत व्यक्त करतो, तेव्हा कळतं
"या नात्याची मुळं केवढी मजबूत आहेत."
असा मित्र रडतो, कारण त्याला त्या नात्याचं अपार मोल असतं. तो रडतो, कारण त्याच्या अंतःकरणातली जागा तुम्ही व्यापलेली असते.तो रडतो, कारण त्याला तुमची साथ हरवण्याची भीती असते.इतकं तीव्र प्रेम आणि न कळत जपलेली भावना… त्यांची किंमत शब्दांनी नाही, मनाने मोजली जाते.
लोक म्हणतात, रडणारे लोक कमकुवत असतात.
पण खरं म्हणजे रडणारे लोकच सर्वाधिक ताकदवान असतात; कारण ते नातं वाचवण्यासाठी स्वतःच्या भावनांना गळ्यातून उतरू देतात.
जर तुमच्या आयुष्यात असा कुणी असेल जो तुमच्यासाठी किंवा तुमच्यामुळे रडला असेल, तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण अशा व्यक्तीची मैत्री, निष्ठा आणि प्रेम… आयुष्यभरासाठी असतं.
अशा मैत्रीत भांडणं असतात, गैरसमज असतात, पण तुटणं नसतं.अश्रूंनी भिजलेली मैत्री ही मोडत नाही ती फक्त अधिक घट्ट, अधिक शुद्ध,अधिक खरी होत जाते.आणि म्हणूनच ज्याच्या डोळ्यांतून आपल्या साठी अश्रू आले,त्याच्या हृदयात आपण किती खोलवर दडलेलो आहोत,हे आपण कधीच मोजू शकणार नाही.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा