" मनोरुग्णांसाठी दानशूर व्यक्तींची आवश्यकता " - मनोरुग्ण सेवक मा.संदीप शिंदे
" कै.बाबारावजी बुंदेले स्मृती मनोरुग्ण सेवा पुरस्काराने शिंदे दांम्पत्य सन्मानित "
" मनोरुग्णांसाठी दानशूर
व्यक्तींची आवश्यकता "
- मनोरुग्ण सेवक मा.संदीप शिंदे
“नंददीप फाऊंडेशन: शिंदे दांपत्याच्या सेवेतून मनोरुग्णांना नवजन्म”
अमरावती (प्रतिनिधी)
मानवी जीवनात काही वेदना अशा असतात की त्या माणसाला खचवतात, पण त्याच वेदना एखाद्याच्या आयुष्याला नवा दिशा देण्याचे सामर्थ्यही ठेवतात. मा. संदीप शिंदे यांच्या आयुष्यातील वेदनादायी क्षणाला असेच परिवर्तन घडवणारे रूप लाभले. सलूनचे दुकान चालवत लहान भाऊ राजेशचे शिक्षण पूर्ण केले, त्याला नोकरी मिळवून दिली; परंतु अचानक झालेल्या अपघातात राजेशचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संदीपजींच्या जीवनात प्रचंड अंधार दाटला. या अंधारातून सुटका मिळवण्यासाठी ते भटकू लागले. या भटकंतीतच त्यांना रस्त्याच्या कडेला, बसस्थानकावर, रेल्वे स्टेशनवर, फाटक्या कपड्यांत, विस्कटलेल्या केसांसह, भुकेने व्याकुळ झालेले आणि समाजाने वाळीत टाकलेले बेघर मनोरुग्ण दिसू लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेदना, एकाकीपणा आणि तिरस्काराचे जखमेचे ठसे स्पष्ट जाणवत होते. “हे लोक कसे जगत असतील?” या प्रश्नाने त्यांच्या मनात खळबळ माजली आणि याच वेदनेतून उदयास आले नंददीप फाऊंडेशन.
नंददीपमध्ये आजपर्यंत एकूण ८२० मनोरुग्णांपैकी १४२ बेघर मनोरुग्णांना आश्रय मिळालेला आहे. उर्वरित ६७८ मनोरुग्ण उपचारानंतर स्वतःच्या घरात परतले असून नव्या आशेने, उत्साहाने जीवन जगत आहेत. “या १४२ मनोरुग्णांची सर्व व्यवस्था समाजातून मिळणाऱ्या दानशूर मदतीच्या जोरावर चालते. ज्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे त्यांनी या कार्यात हातभार लावावा. माझा फोन पे क्रमांक ८२०८२२९२३४ आहे,” असे सांगताना सत्कारमूर्ती मा. संदीप शिंदे यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, प्रा. बुंदेले सरांनी वडिलांच्या स्मृतीने दिलेला पुरस्कार हा त्यांच्या सेवाकार्यात नवी ऊर्जा देणारा आहे, आणि त्याबद्दल ते सदैव ऋणी राहतील.
दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या, टोपे नगर, अमरावती येथील सभागृहात मा. संदीप शिंदे व सौ. नंदिनीताई शिंदे यांना “कै. बाबारावजी बुंदेले स्मृती मनोरुग्ण सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक व्यवस्थापक श्री किशोर राऊत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुरस्कारदाते प्रा. अरुण बुंदेले, प्रमुख अतिथी अनंत कौलगीकर, मुख्याध्यापक दत्तात्रय देशपांडे, प्रा. किशोर देशमुख, मा. मुख्याध्यापक प्रा. बाबुराव शेळके, पंजाबराव धोटे, सुभाष गावंडे, राजेंद्र पाथरे, प्रमोद ठाकरे, लेखक अविनाश राजगुरे तसेच संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य अनिल वानखडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला.
कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे या दांम्पत्याला पाच हजार रुपये रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि २५ पुस्तके देऊन गौरविण्यात आले. तसेच दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फेही श्री किशोर राऊत यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार केला.
या प्रसंगी प्रा. अरुण बुंदेले यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत गौरव करताना सांगितले की, “बेघर, वेडे, पागल, मनोरुग्ण जेव्हा रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्थानकावर आढळतात, तेव्हा शिंदे दांम्पत्य त्यांना नंददीपमध्ये आणतात; त्यांची दाढी-कटिंग करतात, स्नान घालतात, निवारा आणि अन्नाची सोय करतात आणि नंतर त्यांचे पुनर्वसन करतात. ८२० पैकी ६७८ मनोरुग्ण पुन्हा स्वतःच्या घरात परतले आहेत. ते म्हणतात.‘शिंदे दांम्पत्यामुळे आमचा पुनर्जन्म झाला.’ अशा सेवेचा सन्मान करणे हेच आमचे भाग्य आहे.”
अध्यक्षीय भाषणात श्री किशोर राऊत यांनी मनाला भिडणाऱ्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले, “मनोरुग्ण सेवेला संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे शिंदे दांम्पत्य आज जे कार्य करीत आहेत ते आई-वडील म्हातारे झाल्यावर अनेकजण स्वतःच्या आई-वडिलांसाठीही करीत नाहीत. या दांम्पत्याची माणुसकी, त्याग आणि सेवा म्हणजे जिवंत देवत्वच आहे. ते मनोरुग्णांचे देव आहेत.”
सौ. रंजना निचळ, अनिल चव्हाण, श्री मानकर यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन कु. पल्लवी ठाकरे यांनी कौशल्यपूर्णरीत्या पार पाडले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली; परंतु उपस्थितांच्या मनात एकच भावना सतत जागी राहिली.की माणुसकीचा दीप अजूनही तेजाने पेटलेला आहे, आणि त्या दीपाचे नाव आहे नंददीप फाऊंडेशन, ज्याच्या प्रकाशात मा. संदीप शिंदे आणि सौ. नंदिनी शिंदे यांनी असंख्य मनोरुग्णांना जगण्याचा नवा प्रकाश दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा