विश्वास तुटला की बोलणं नव्हे,दूर जाणंच योग्य....!
विश्वास तुटला की बोलणं नव्हे,दूर जाणंच योग्य....!
विश्वास हा कोणत्याही नात्याचा आत्मा असतो.तो असेल तर नातं जगतं, फुलतं; आणि तो तुटला की नातं केवळ नावापुरतंच उरतं. कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवावा, आपल्याशी प्रामाणिक राहावं,ही माणसांची नैसर्गिक अपेक्षा असते.पण जेव्हा एखादी व्यक्ती त्या अपेक्षेवर पाय देऊन चालते, तेव्हा मनाच्या आत खोलवर एक वेदना उमटते.अगदी न सांगता आढळणाऱ्या जखमे प्रमाणे.
विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीकडून जाब विचारणं हे अनेकदा आपल्यालाच पुन्हा जखमी करणं ठरतं. कारण अशा लोकांकडे स्पष्टीकरणांच्या मोठ्या गोष्टी असतात. ते शब्दांच्या नुसत्या चकव्यात आपल्याला अडकवतात, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा आटापिटा करतात आणि पुन्हा वेळी येईल तेव्हा तोच घाव घालतात. त्यांच्यासाठी विश्वास हा केवळ वापरण्याचं साधन असतं.मनापासून निभावण्याचं मूल्य त्यांना कधीच कळलेलं नसतं.
म्हणूनच अशा लोकांकडे एकही प्रश्न विचारू नये. कुणी आपल्याला वारंवार दुखावणारं असो, तर त्यांना दोष सांगून थांबवता येत नाही.त्यांना फक्त दूर ठेवलं जातं. आणि तेच खरं धैर्य असतं. रागाने नाही, आरडाओरड करून नाही… शांतपणे. कारण शांतता हीच त्यांच्या चुकीचं सर्वात तीव्र उत्तर असतं.
जर ती व्यक्ती आपल्या नात्यातली असेल.मित्र, सोबती किंवा जवळची तर त्यांना आपल्या जवळून दूर करणं ही स्वतःवर केलेली सर्वात मोठी कृती ठरते. ज्यांना विश्वासघात करण्याची सवयच झालेली असते, ते लोक क्वचितच बदलतात. ते आधी आपल्याला विश्वासात घेतात, आपल्याला त्यांच्या शब्दांनी बांधून ठेवतात आणि मग हळूहळू पुन्हा त्याच वेदनेचं दान देतात. अशा लोकांच्या विश्वात आपले भावनांचे, आपला त्यागाचे, आपला विश्वासाचे काहीच मोल नसतं.
मग अशा वेळी काय करायचं?
फक्त एक शांत, स्थिर पाऊल मागे घेायचं.
काही न सांगता… कुणाला काही सिद्ध न करता…
कारण कधी कधी नात्यातून मागे हटणं म्हणजे हार नव्हे; ती स्वतःच्या मनाचा, आत्मसन्मानाचा आदर असतो. आपल्या शांत दूर जाण्यातच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा दडलेला असतो. शब्दांनी दिलेली शिक्षा विसरता येते, पण एखादी व्यक्ती कायमची निसटून गेल्याची पोकळी कधीच भरून येत नाही.
शेवटी, आयुष्य फार मौल्यवान आहे. जे आपला विश्वास तोडतात, त्यांच्यावर आपल्या जीवनाचा एकही क्षण वाया घालवणं योग्य नाही. मनातली शांतता आणि स्वाभिमान हेच सर्वात मोठे धन आणि ते वाचवण्यासाठी अनेकदा नात्यांना सोडून द्यावं लागतं.
म्हणूनचशांतपणे दूर जाणं… हीच विश्वासघाताला दिलेली सर्वात सुंदर, सन्मानाची आणि अचूक शिक्षा असते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा