दि.२८ नोव्हेंबर २०२५ क्रांतिसूर्य महात्मा जांतीराव फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त लेख


दि.२८ नोव्हेंबर २०२५ क्रांतिसूर्य महात्मा जांतीराव फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त लेख
-------------------------------------------------------

महात्मा फुले : सर्वकष गुलामगिरीवर
हल्ला करणारे थोर समाजक्रांतिकारक

महात्मा फुलेंच्या । कार्याला नमन ।
करांनी वंदन । स्मृतिदिनी ॥

       थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ,स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजसुधारणा आणि सत्यशोधनासाठी समर्पित करणारे महान व्यक्तिमत्त्व,भारतातील सामाजिक गुलामगिरीच्या विरूद्ध बंड पुकारणारे आणि सर्वंकष गुलामगिरीवर हल्ला करणारे क्रांतिकारक, बहुजनांचे मुक्तिदाता,  स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक,कृषितज्ज्ञ,अर्थतज्ज्ञ,आधुनिक नाटककार,निबंधकार, आद्य शिवचरित्रकार,पुणे नगरीचे आयुक्त,सत्यशोधक क्रांतिपूर्य महात्मा जोतीराव फुले यांना आज दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी असलेल्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
          महात्मा फुले यांचा जन्म पुणे येथे सन : १८२७ सालातील एप्रिल महिन्याच्या ११ तारखेला झाला.समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करणे हे त्यांचे ध्येय होते.स्त्री-शिक्षणाचे महत्त्व त्यांनी सर्वात आधी ओळखले. दि.१ जानेवारी १८४८ मध्ये त्यांनी पुणे येथील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला त्यांनी विद्येचे द्वार उघडे केले.ही शाळा सुरू करून त्यांनी एका नव्या शैक्षणिक युगाचा ओनामा केला.त्यांच्या या कार्यात त्यांची भार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी खंबीरपणे साथ तर दिलीच शिवाय महात्मा फुलेंच्या निधनानंतरही त्यांचे कार्य स्वतःच्या अंतापर्यंत सुरू ठेवले.महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन स्वतः स्थापन केलेल्या शाळेमध्ये शिक्षिका बनविले. त्यांनी सुद्धा ते कार्य अंगावर दगड ,धोंडे व शेणाचा मारा सहन करून पूर्णत्वास नेले ; म्हणूनच सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.
        फुले दाम्पत्यांनी अस्पृश्यता आणि जातिभेदाविरुद्ध तीव्र लढा दिला होता.शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हितासाठी त्यांनी फार मोठे कार्य तत्कालीन काळात करून शेतकरी व कष्टकरी यांना न्याय मिळवून दिला. दि.२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली. सत्यावर आधारित जीवन जगण्याची शिकवण समाजाला देणे हा सत्यशोधक समाजाचा उद्देश होता.
‘विद्येविना मती गेली,
 मतीविना नीती गेली, 
नीतीविना गती गेली, 
गतीविना वित्त गेले, 
वित्ताविना शूद्र खचले, 
इतके अनर्थ एका अविद्येने केले.’
या त्यांच्या सुविचारातील त्यांच्या मनातील तत्त्वज्ञान आजही शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते.
       महात्मा फुले यांना 'महात्मा' ही पदवी मुंबईतील कष्टकरी जनतेच्या वतीने मुंबईतील लोकांनी,मुख्यत्वे रावबहादूर वड्डेदार (रावबहादूर बेडेकर) यांच्या हस्ते दि.११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथील वडगांव गादी रघुनाथ (रघुनाथ महाराज) सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात ​त्यांच्या महान सामाजिक कार्याची  दखल घेऊन मुंबईतील जनतेने जोतीराव फुले यांना "महात्मा" ही पदवी प्रधान केली.त्यांनी रुढीवादी विचारांना आव्हान दिले आणि मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे हा त्यांचा महत्त्वपूर्ण विचार आहे . त्यांचा हा पुरोगामी आणि आधुनिक विचार आजही प्रेरणादायी आहे .
              क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी लिहिलेल्या विविध प्रकाशित व अप्रकाशित पुस्तकातून - नाटकातून स्वतःचे परिवर्तनवादी  विचार बहुजन समाजापर्यंत पोहोचविण्याचा सतत प्रयत्न केला.महात्मा फुले यांचे महत्त्वाचे प्रकाशित साहित्य :
(१) नाटक तृतीय रत्न - इ.स. १८५५ - या नाटकात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व,अज्ञान व अंधश्रद्धेवर टीका केलेली आहे.हे मराठीतील पहिले आधुनिक सामाजिक नाटक मानले जाते.(२) छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा - जून - १८६९ छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व शौर्य या वाड्यात त्यांनी वर्णन केले आहे .(३)पोवाडा -विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी -जून - १८६९ - या पोवाड्यातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील ब्राह्मण शिक्षकांची मक्तेदारी आणि शूद्रांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. (४)ब्राह्मणांचे कसब - इ.स. १८६९ - या पुस्तकात त्यांनी ब्राह्मण पुरोहितांकडून होणारी फसवणूक आणि धार्मिक कर्मकांडांवर टीका केली.(५) गुलामगिरी -इ.स.१८७३ - या पुस्तकात त्यांनी शूद्र-अतिशूद्रांच्या गुलामगिरीचे ऐतिहासिक आणि सामाजिक विश्लेषण अतिशय मार्मिकपणे केले आहे .हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांना समर्पित केले. (६) शेतकऱ्याचा असूड -१८ जुलै १८८३ - या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाचे व दुर्दशेचे चित्रण,त्यांच्या समस्या आणि उपाय दिलेले आहेत. आज शेतकऱ्यांच्या घराघरात या पुस्तकाचे वाचन होणे आवश्यक आहे म्हणजे तशा प्रकारची शेती करून आजचा शेतकरी समृद्ध व सुखी होईल व आत्महत्येपासून परावृत्त होईल.(७) काव्य - अखंडादी काव्य  रचना - इ.स.१८८७ - या 'अखंडातून' जातीभेद, धर्म आणि कर्मकांडांवर टीका आहे.आज प्रत्येक अखंड सुविचार बनलेला आहे.
"एक दिन तरी मद्य वर्ज करा ।
 तोच पैसा भरा ग्रंथासाठी ॥"
ग्रंथाचे मोल सांगणारा हा अखंड आज प्रत्येक ग्रंथालयात सुविचाराच्या स्वरूपात आपल्याला दिसतो.असे विविध विषयावरील त्यांचे अखंड सर्वांनाच प्रेरणा देत राहणार आहेत.लेख मोठा होण्याच्या भयास्तव मी येथे ते देऊ शकत नाही.यासाठी वाचकांनी महात्मा फुलेंची अखंडादी काव्यरचना जरूर वाचावी.(८) सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक -एप्रिल - १८८९ मध्ये महात्मा फुले यांनी त्यांचे हे अखेरचे पुस्तक लिहिले .हे 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक'  पक्षाघाताच्या (अर्धांगवायूच्या) आजारात असताना लिहिलेले आहे.​आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना पक्षाघाताची बाधा झाली होती,ज्यामुळे त्यांचा उजवा हात निकामी झाला होता.​आपला उजवा हात निकामी झाला असतानाही त्यांनी निराश न होता डाव्या हाताने हे महत्त्वाचे पुस्तक लिहून पूर्ण केले. शूद्रादी- अतिशूद्रांसह सर्व मानवांच्या हितासाठी त्यांनी हा ग्रंथ रचला. या संवादात्मक पुस्तक धर्म, पाप,पुण्य इत्यादी विषयांवर असून त्यातून त्यांनी स्वतःला अभिप्रेत असलेल्या 'सार्वजनिक सत्यधर्माची' तत्त्वे स्पष्ट केलेली आहेत.महात्मा फुले यांचा दि.२८ नोव्हेंबर १८९० मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तक पुत्र यशवंत फुले यांनी हे पुस्तक १८९१ मध्ये प्रकाशित केले.
            वरील आठ प्रकाशित पुस्तकाच्या व्यतिरिक्त इतर लेखन व निवेदन त्यांनी लिहिलेली आहेत.(९) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट - २० मार्च १८७७ .(१०) दुष्काळविषयक पत्रक - दि .२४ मे १८७७ (११) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन - दि.१९ ऑक्टोबर १८८२ यात त्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी केली होती.(१२) सत्सार भाग १ व २ -इ.स. १८८५ - महात्मा फुले यांनी 'सत्सार' हे मासिक निबंधांच्या स्वरूपात दोन अंकामध्ये प्रकाशित केले.​यामध्ये त्यांनी प्रामुख्याने बहुजन समाजावरील मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी ​ब्राह्म समाज आणि प्रार्थना समाज यांच्या विचारधारेवर चर्चा,​वेगवेगळ्या जातींतील लोकांपासून जन्मलेल्या मुलांची सामाजिक स्थिती,​आर्यभट्टांचे (आर्य लोकांचे) विचार व विचारधारा तर ​दुसऱ्या भागात त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.​थोडक्यात, त्यांच्या सत्यशोधक चळवळीचे आणि सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्याचे विचार स्पष्ट करणारे एक महत्त्वाचे साहित्य म्हणजे सत्सार होय.(१३) इशारा (ग्रंथ) -ऑक्टोंबर इ.स. १८८५ -इशारा ​हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या वैचारिक लढ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे .ज्यामध्ये सत्य, समता आणि मानवी हक्क यावर आधारित समाज निर्मितीवर भर दिला गेला होता.'इशारा' हा ग्रंथ सुधारणेच्या नावाखाली समाजातील मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव नसलेल्यांना महात्मा फुले यांनी दिलेला कडक इशारा होता. (१४) ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर -२९ मार्च  १८८६ .(१५) सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी (जून - १८८७)अप्रकाशित ग्रंथ: अस्पृश्यांची कैफियत .अशी महात्मा फुले यांची विविधता पूर्ण परिवर्तनवादी साहित्य संपदा आहे .
            सन : १८९० सालातील नोव्हेंबर महिन्याच्या २८ तारखेला महात्मा फुले यांचा मृत्यू झाला पण त्यांचे सर्व क्षेत्रातील कार्य समाजाला आजही प्रेरणा देत आहे.महात्मा फुले यांचा विचार त्यांच्या आज असलेल्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त आचरणात आणून आदरांजली अर्पण करू या.
महात्मा फुलेंचा । आज स्मृतीदिन । 
करांनी वंदन । कोटी कोटी ॥

    महात्मा फुले राज्यस्तरीय
 आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
   अभंगकार व साहित्यिक
 प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती.८०८७७४८६०९.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !