मनात सदैव जिवंत राहणारे शरदकुमार बन्सी सर...!
मनात सदैव जिवंत राहणारे शरदकुमार बन्सी सर...!
स्व. शरदकुमार बन्सी सर… एक साधं नाव, पण मनात कायम घर करून राहिलेली व्यक्ती. धरणगावच्या लोकमत दैनिकाचे प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक, समाजातील प्रत्येकाच्या सुख–दुःखात सामील होणारा एक दिलदार माणूस… आज ते आपल्या सोबत नाहीत, हे स्वीकारणं आजही कठीण जातं.
त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, सुसंस्कृतपणा आणि माणुसकीची ऊब. कुणालाही न दुखवता, सर्वांना सोबत घेऊन चालणे ही त्यांची जणू जीवनशैलीच होती. गावातल्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक समस्येत, प्रत्येक आनंदात ते प्रेमाने, मनापासून सहभागी व्हायचे. जेथे शरदकुमार सर असायचे, तेथे वातावरणात आपोआपच प्रसन्नता पसरायची.
त्यांचा वाढदिवस… आजचा दिवस. पण ते नसल्याची पोकळी आणखी प्रकर्षाने जाणवते. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची आठवण अधिक तीव्र होते, कारण त्यांच्या आठवणीतही प्रेम, आदर आणि माणुसकीचंच तेज आहे. आज जरी ते या जगात नसले तरीही त्यांच्या शिकवणी, त्यांचे हसू, त्यांची निष्ठा, आणि त्यांचे प्रेम धरणगावकरांच्या मनात आजही तितकंच जिवंत आहे.
त्यांनी दिलेल्या मूल्यांची संपत्ती प्रामाणिकपणा,
कर्तव्यनिष्ठा, आणि माणसांना माणूस म्हणून पाहण्याची कला आज ही अनेकांना प्रेरणा देत आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी केवळ अभ्यास नाही शिकवला, तर आयुष्य जगण्याची सोपी आणि सुंदर दिशा दिली.
आज त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होताना मनात एकच भावना दाटून येते.“माणूस गेल्यावर त्याचं अस्तित्व संपत नाही; त्याने केलेली माणुसकीची पेरणी काळाच्या पलीकडे फुलत राहते.”
स्व. शरदकुमार बन्सी सरांना त्यांच्या जयंतीनिमित्त मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांची आठवण…आजही, उद्याही… आणि पुढच्या प्रत्येक पावलावर साथ देणारीच राहील.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा