खरी संपत्ती आई वडील....!


खरी संपत्ती आई वडील....!

मनुष्य आयुष्यभर धावत असतो.कधी पैशासाठी, कधी घरासाठी, कधी यशासाठी… पण या धावपळीत आपल्या लक्षातही येत नाही की आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत आहोत, त्या खरी संपत्ती नसतातच. खरी संपत्ती म्हणजे काय, हे जाणण्यासाठी मोठं होण्याची गरज नसते; हृदय जिवंत असलं, प्रेम जाणवत असलं की कळतं.खरी संपत्ती म्हणजे आई आणि वडील.

आयुष्यात काही कमी असलं तरी हरकत नाही, पण त्यांच्या प्रेमाची उब असणं हीच सर्वात मोठी श्रीमंती आहे.मोठा बंगला नसलाच तरी मनाच्या छपरावर त्यांचे हात असतील, तर तेच खरे महाल आहेत.लाख मोलाची गाडी नसली तरी काय होतं? त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंदच जगातील सर्वात सुंदर प्रकाश आहे.नाव मोठं नसलं तरी त्यांचं आशीर्वादाचं कवच असलं की आयुष्याची वाट सोपी होते.

लोक गरीब म्हणू देत, हिणवू देत… पण ज्याच्याकडे आई-वडिलांचे प्रेम आहे, त्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. कारण ही श्रीमंती ना चोर शकतो, ना काळ हिसकावून नेऊ शकतो. ही अशी संपत्ती आहे की जी आत्म्याला बळ देते, मनाला शांत करते आणि जगण्याला अर्थ देते.

देवळात देव भेटला नाही तरी चालतं…कारण घरात जे विठ्ठल-रखुमाई रोज हसतात, काळजी करतात, आणि आपल्यासाठी जगतात.तेच तर खरे देव आहेत.
त्यांच्या पायांपाशीच स्वर्ग सापडतो, त्यांच्या हास्यातच प्रसाद मिळतो, आणि त्यांच्या आशीर्वादातच भवितव्य उजळून निघतं.

आई-वडिलांचं अस्तित्व म्हणजे आयुष्याचा खरा खजिना,त्यांची साथ म्हणजे जिवनाची खरी श्रीमंती,
आणि त्यांचं प्रेम म्हणजे परमात्याचा आशीर्वाद.

खरी संपत्ती… ती घरातच असते आई आणि बाबा या रूपाने. त्यांना जपा, त्यांना समजा, त्यांच्यासोबत वेळ घाला… कारण त्यांच्या मायेपेक्षा अमूल्य अशी संपत्ती जगात कुठेच नाही.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !