आकाशाला भिडलेली जिद्द जांभोऱ्याचा मयुर...!
आकाशाला भिडलेली जिद्द जांभोऱ्याचा मयुर...!
जांभोरे… धरणगाव तालुक्यातील शांत, साधं पण कष्टांनी घडलेलं गाव. उन्हातान्हात श्रम करून जगणाऱ्या माणसांचं हे घरकुल. या गावातल्या एका साध्या कुटुंबात जन्म झाला.मयुर कैलास गोसावी. घर तसं छोटंसं, रोजच्या गरजा भागवताना कुटुंबाला शंभर विचार करावे लागणारे, पण मन मात्र मोठं. आई-वडिलांच्या कष्टांतून जग बघणारा मयुर आतून मात्र आकाशा एवढी स्वप्नं बाळगून होता.
वडील शिवणकाम करून घर चालवायचे. दिवसभर मशीनचा किरकिरणारा आवाज जणू त्यांच्या संघर्षाची साक्ष देणारा. हातातील दोऱ्यांप्रमाणे त्यांनी आयुष्यातल्या अडथळ्यांवर मार्ग शिवला होता. दुसरीकडे आई शेतात मजुरी करत घराचा भार स्वतःच्या खांद्यावर उचलायची. गरिबीच्या चटक्यांनी रोज त्रास दिला तरी दोघांच्या ही चेहऱ्यावर तक्रारी नव्हत्या; कष्ट आणि ममतेचीच सावली होती.
या घरात वाढलेल्या मयुरकडे ऐश्वर्य नव्हतं, पण संस्कारांची शिदोरी मात्र भरभरून होती. त्याच्या डोळ्यांत वाढत्या वयातच एकच ध्यास पक्का झाला.
काही तरी मोठं करायचं… घर बदलायचं… आई-वडिलांना अभिमानाची सावली द्यायची.
शाळेतून आल्यावर तो आईला शेतात मदत करायचा, किंवा बाबांसोबत शिवणकामात हातभार लावायचा. पण संध्याकाळ झाली की त्याचा एकच साथी स्टडी टेबलवरची मंद उजेडात झगमगणारी दिव्याची ज्योत. त्या प्रकाशात त्याने जिद्दीची शपथ घेतली होती. पुस्तकांच्या पानांवर त्याची स्वप्नं उमलायची.
“घराची प्रगती करायची असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग,” हे वाक्य मयुरने मनावर कोरलं होतं. कितीही थकवा आला तरी अभ्यास थांबायचा नाही.हा त्याचा स्वतःशी केलेला करार होता. काळ बदलत गेला, वर्ग बदलत गेले, पण त्याची चिकाटी मात्र बदलली नाही.
हळूहळू त्याच्या मनात एक धग पेटू लागली.इंडियन एअर फोर्स!ही केवळ नोकरी नव्हती, तर स्वाभिमान, शिस्त, कर्तव्य आणि देशसेवा यांचं प्रतीक. गावातील मातीचा सुगंध आणि आई-वडिलांच्या कष्टांचा भार त्याला या स्वप्नाकडे अधिक ओढत होता.
तयारी कठोर होती, परीक्षा कठीण होती, आणि परिस्थिती तर त्याहीपेक्षा कठीण. पण मयुरला माहीत होतं.स्वप्नं ही परिस्थितीला नाही, तर मनाला विचारून पूर्ण केली जातात. अपयशाच्या धक्क्यातही तो उभा राहिला. जिथे इतर मागे हटतात तिथून त्याची सुरुवात व्हायची.
आणि अखेर तो दिवस उगवला…ज्या दिवशी त्याच्या नावासमोर ‘इंडियन एअर फोर्स’ हा शब्द झळकला. क्षणभर सर्व काही थांबल्यासारखं झालं. मयुरच्या डोळ्यांत पाणी दाटलं… पण त्या पाण्यात वेदना नव्हत्या होत्या असीम आनंदाच्या लहरी.
आईने आयुष्यभर उन्हातान्हात कष्ट करून केलेली मजुरी त्या एका क्षणात सार्थ झाली. वडिलांच्या शिवण मशीनने जणू आनंदाचा ताल वाजवला. गावातल्या लोकांनी त्याला मिठ्या मारत अभिमानाने म्हटलं
“आपला मयुर आकाशात झेप घेणार!”
तेव्हा जांभोऱ्याच्या प्रत्येक घरात, प्रत्येक मनात आनंदाचे दिवे पेटले. मातीने फुलवलं, संघर्षांनी घडवलं आणि जिद्दीने उंचावलेलं हे यश केवळ मयुरचं नव्हतं. हे त्या प्रत्येक आईचं यश होतं जी मुलाला उज्वल भविष्यासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवते. हे त्या प्रत्येक वडिलांचं यश होतं जे कष्टांच्या जंजीरातही स्वप्नांचा हात सोडत नाहीत. आणि हे त्या प्रत्येक तरुणाचं यश होतं जो
परिस्थितीसमोर हार न मानता आकाशाला गाठण्याची हिंमत ठेवतो.
आज मयुरच्या युनिफॉर्मवरची प्रत्येक पट्टी त्याच्या घामाची आठवण करून देईल. त्याच्या वर्दीतील निळा रंग पाहताना गावकऱ्यांच्या डोळ्यांत जणू संपूर्ण आकाश चमकताना दिसेल. त्याची भरारी जांभोऱ्याचं नाव देशभर पोचवते.
मयुरची कहाणी शिकवून जाते स्वप्नं किती उंच आहेत याला काही अर्थ नाही;महत्त्वाचं असतं.त्यांच्याकडे जाणारी पावलं किती निर्धाराने टाकली जातात.कष्ट, श्रद्धा आणि अढळ जिद्द असेल तर कुठलंही आकाश आपल्या पंखांसमोर लहान ठरतं.
आज जांभोरे गावाचा मुलगा नाही.तो भारताचा वीर झाला आहे. आणि त्याच्या कुटुंबाचा अभिमान तर शब्दात मावणारा नाही.मयुरला पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.त्याची भरारी अशीच उंचावत राहो…
आणि जांभोऱ्याचं नाव आकाशात असंच चमकत राहो!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा