पैसा कागदाचा तुकडा की जिवनाची दिशा ?
पैसा कागदाचा तुकडा की जिवनाची दिशा ?
पैसा… ऐकायला साधा शब्द, पण जगातील अर्ध्या आनंदाचा आणि अर्ध्या वेदनेचा पाया. कागदाचा तुकडा असूनही हा तुकडा माणसाच्या आयुष्याला चकाकी देतो, कधी भ्रम निर्माण करतो, तर कधी अंधारातही प्रकाश दाखवतो. पैशाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा कोणासाठी सुरक्षितता, कोणासाठी प्रतिष्ठा, कोणासाठी स्वप्नपूर्ती; तर कोणासाठी रोजच्या जगण्याची धडपड.
पैसा हातात आला की माणसाच्या चालण्यात एक विश्वास निर्माण होतो, पण त्याच पैशाने मनात हळूहळू बदल घडू लागतात. काही बदल चांगले असतात. मेहनतीचं फळ मिळाल्याचा आनंद, कुटुंबाला चांगलं देण्याचं समाधान. पण काही बदल नकळत हृदयाची मऊ बाजू कठोर करतात. पैशाची चव जिभेला लागू लागली की नात्यांची गोडी कमी होऊ लागते; कारण पैसा जिंकण्याच्या स्पर्धेत मनुष्य अनेकदा मनं हरवतो.
पैसा नसला की मनात काळजीचं ओझं बसतं, भविष्य धूसर वाटतं. आणि पैसा गमावला की आपण स्वतःकडून काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. पण खरा प्रश्न पैशाच्या कमी-जास्तीत नाही, तर आपण त्याला दिलेल्या स्थानात असतो. पैसा खिशात असेल तर तो साधन बनतो; पण मनात शिरला की तो स्वामी बनतो. आणि स्वामी बनला की मन माणसाच्या ताब्यात राहत नाही.
मेहनतीनं मिळालेला पैसा हातावर कोरलेल्या रेषांसारखा असतो खरा, टिकणारा, अभिमान देणारा. पण चुकीनं, शॉर्टकटनं मिळालेला पैसा सावलीसारखा असतो कधी कुठून भीती घेऊन धावून येईल सांगता येत नाही. जगातील व्यवहार पैशावर चालतात, पण जीवन जगण्यासाठी जे आवश्यक असतं त्या गोष्टी प्रेम, विश्वास, शांतता, समाधान त्या पैशाच्या दुकानात कधीच विकत मिळत नाहीत.
शेवटी पैसा हवाच असतो, कारण त्याशिवाय जीवन थांबतं… पण पैशाच्याच मागे धावलं तर जीवनाचं सौंदर्य हरवतं.पैसा कमवा, पण मन राखा.पैसा वाढवा, पण नाती जपा.पैसा वापरा, पण स्वतःला हरवू देऊ नका.
कारण शेवटी पैसा जगण्यासाठी आहे…जगण्यावर राज्य करण्यासाठी नाही.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा