सेवेचा दीपस्तंभ स्वर्गीय वीणा शशिकांत भावे.....!


सेवेचा दीपस्तंभ स्वर्गीय वीणा शशिकांत भावे.....!

काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या प्रवाहात हरवून जात नाहीत; ती स्मृतींच्या आकाशात दीपस्तंभासारखी सदैव प्रकाशमान राहतात. स्वर्गीय वीणा शशिकांत भावे हे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. आजही धरणगावच्या जनमानसात त्यांचे नाव आदराने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने घेतले जाते.

दि. २६ जानेवारी १९५३ रोजी जन्मलेल्या वीणा ताईंनी B.A., D.Ed. असे शिक्षण पूर्ण करून शिक्षणक्षेत्रात आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. बालकवी विद्यालय ही त्यांची कर्मभूमी. त्या केवळ विषय शिकवणाऱ्या शिक्षिका नव्हत्या; त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या मार्गदर्शक, आईसमान पालक होत्या. शिस्त, संस्कार आणि मायेचा सुरेख संगम त्यांच्या अध्यापनात प्रकर्षाने जाणवत असे. म्हणूनच त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सर्वत्र ओळखल्या जात.

शिक्षणासोबतच सामाजिक जाणिवेने त्यांचे मन सदैव अस्वस्थ असे. समाजातील प्रश्न, सामान्य माणसाचे दुःख, महिलांचे हक्क व सन्मान या साऱ्यांविषयी त्यांची संवेदनशीलता जागी असे. सेवानिवृत्तीनंतर लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी सन २००६ मध्ये राजकीय जीवनात प्रवेश केला. हा मार्ग सोपा नव्हता; मात्र प्रामाणिकपणा, लोकांशी असलेली घट्ट नाळ आणि सेवाभाव यांच्या बळावर त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आणि निवडणूक जिंकून दाखवली.

सन २००९ मध्ये नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. एकदा जनसेवेला वाहून घेतल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. पद हे त्यांच्या दृष्टीने सत्तेचे साधन नव्हते; ते सेवेचे माध्यम होते. प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी माणूस असायचा. म्हणूनच त्या केवळ नगराध्यक्ष नव्हत्या, तर सर्वसामान्यांच्या हृदयातील आपल्या वीणा ताई होत्या.

आज त्या आपल्या सोबत नाहीत, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. तरीही त्यांचे कार्य, त्यांची माणुसकी आणि त्यांच्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव पप्पू भावे आईचा सेवाव्रताचा वारसा पुढे नेत आहेत. धरणगाव नगरपालिकेत नगरसेवक तसेच गटनेते म्हणून त्यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आईप्रमाणेच तेही प्रेमळ, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

मित्र कसा असावा, नेता कसा असावा आणि माणूस कसा असावा.याचे ते जिवंत उदाहरण आहेत. आईच्या संस्कारांचा ठसा त्यांच्या प्रत्येक कृतीत स्पष्टपणे दिसून येतो. स्वर्गीय वीणा ताईंनी जे बीज पेरले, ते त्यांच्या पुत्राच्या रूपाने आजही फुलत आहे.हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली.

देह नश्वर असतो, परंतु कार्य अमर असते.स्वर्गीय वीणा शशिकांत भावे यांचे जीवन याचेच श्रेष्ठ उदाहरण आहे.
त्या होत्या, आहेत आणि सदैव राहतील.आपल्या आठवणीत,आपल्या हृदयात. 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !