पगाराच्या कागदापुढे हरलेली माती.....!
पगाराच्या कागदापुढे हरलेली माती.....!
आज गावागावात एक वाक्य दबक्या आवाजात फिरतंय
“मुलगा नोकरीवाला पाहिजे, शेतकरी नको.”हे वाक्य ऐकताना कुणाचं तरी पोट रिकामं होतं, पण कुणाच्या तरी डोळ्यांतून घाम गळतो. कारण हे वाक्य फक्त विवाहाचं नाही, तर मूल्यांचं आहे.
शेतात राबणारे हात उन्हात भाजलेले असतात. त्या हातांवर माती असते, पण त्या मातीला समाजाने कमीपणाचं लेबल लावलंय. शिक्षण, कष्ट, स्वाभिमान सगळं असूनही “शेतकरी मुलगा म्हणजे अनिश्चित भविष्य” असा शिक्का मारला जातो. जणू शेतकऱ्याचं आयुष्य हे जोखमीचं असतं, पण शहरातल्या चार भिंतीत बसून मानसिक गुलामगिरी करणारी नोकरी सुरक्षित असते!
विडंबन बघा त्याच शेतातून आलेलं अन्न शहरातल्या ताटात मानाने बसतं.पण त्या अन्नाला जन्म देणाऱ्या माणसाला सून देताना प्रतिष्ठा आठवत नाही.मुलगी द्यायची वेळ आली की मातीची किंमत विसरली जाते,
आणि पगाराची पावतीच माणसाचं मोल ठरवते.
शेतकरी मुलगा कर्जात आहे, असं सांगितलं जातं.
पण सरकारी किंवा शहरी नोकरीवाला विचारांनी किती गरीब आहे, हे कुणी बोलत नाही.कारण कर्ज फक्त पैशाचं नसतं काही लोक मानसिकतेच्याच कर्जात आयुष्य काढतात.
नातं स्थिर ठेवण्यासाठी जमिनीपेक्षा मन मजबूत लागतं.
शेती म्हणजे मागासलेपण नाही,ती धैर्य आहे, संघर्ष आहे, आणि जगण्याची कला आहे.निसर्गाशी रोज लढून जो माणूस उभा राहतो,तो माणूस नातंही प्रामाणिकपणे निभावू शकतो.
आजचा तरुण शेतकरी केवळ शेतात राबत नाही.तो आधुनिक तंत्रज्ञान वापरतो, बाजार समजून घेतो,आणि अनेक वेळा शहरातल्या नोकरीवाल्यांपेक्षा जास्त पैसा कमावतो.तरीही “शहरी नोकरीवाला नवरा हवा” ही मानसिकता बदलत नाही.कारण प्रश्न पैशाचा नाही, प्रतिष्ठेच्या कल्पनेचा आहे.
समाजाने माणसाला रोजगाराच्या चौकटीत मोजणं थांबवलं पाहिजे.नाहीतर एक दिवस अन्न देणारा हात एकटाच राहील.आणि तेव्हा पगाराचा कागद पोट भरू शकणार नाही.
शेवटी प्रश्न नोकरीचा नाही,प्रश्न दृष्टिकोनाचा आहे.
मातीला कमी लेखणारा समाज कधीच मजबूत उभा राहू शकत नाही.कारण मातीशिवाय माणूस नाही…आणि शेतकऱ्याशिवाय भविष्य नाही.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा