मतांपेक्षा माणुसकी मोठी....!



मतांपेक्षा माणुसकी मोठी....!

आज निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. काही चेहऱ्यांवर आनंद असेल, काही डोळ्यांत शांत निराशा. पण लक्षात ठेवूया. हा दिवस केवळ विजय-पराभवाचा नाही, तर लोकशाहीच्या परिपक्वतेची परीक्षा घेणारा आहे.

जिंकणाऱ्याला मनापासून शुभेच्छा. लोकांनी दिलेला कौल हा विश्वासाचा असतो, आणि त्या विश्वासाला मान देणे हीच खरी जिंकलेपणाची खूण आहे. पण त्या आनंदात थोडी नम्रता हवी. कारण विजयाचा जल्लोष क्षणिक असतो, पण त्यातून उमटणारी माणुसकी दीर्घकाळ लक्षात राहते.

जो हरतो, तो कमी नसतो. पराभव म्हणजे अपयश नाही; तो शिकवण असते, अनुभव असतो. आज ज्याच्या गळ्यात हार नाही, त्याच्या मनात उद्याचा नवा संकल्प असू शकतो. त्याच्या पराभवाचा अपमान करू नका, त्याला तुच्छ लेखू नका, त्याच्या भावना दुखावू नका. कारण मतभेद असू शकतात, पण माणुसकीत भेद नसावा.

विजयाचा आनंद असू द्या.तो स्वाभाविक आहे. पण उन्माद नको. कारण विजय जितका मोठा, तितकी जबाबदारी त्याहून मोठी असते. लोकांनी दिलेला अधिकार हा मिरवण्यासाठी नसतो; तो निभावण्यासाठी असतो. आजचा विजेता हा लोकशाहीचा सेवक आहे मालक नाही. त्याने लोकांच्या अपेक्षा, प्रश्न, वेदना आपल्या मनाशी बांधून ठेवायला हव्यात.

लोकशाहीचा खरा विजय मतमोजणीत नसतो. तो माणुसकी जपण्यात असतो.विरोधी मतांचा सन्मान करण्यात, पराभूताला सन्मानाने उभे राहू देण्यात, आणि सत्तेचा वापर सेवेकरिता करण्यात असतो. कारण आजचा पराभूत उद्याचा मजबूत नेता असू शकतो, आणि आजचा विजेता उद्या लोकांच्या कसोटीला सामोरा जाणार असतो.

चला, आज एक सुंदर परंपरा जपूया विजयात नम्रता ठेवूया,पराभवात सन्मान राखूया,आणि राजकारणापेक्षा माणुसकी मोठी मानूया.कारण शेवटी, लोकशाहीचे खरे यश मते जिंकण्यात नाही,तर माणसे जिंकण्यात आहे.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !