गरिबीच्या छायेतून तेजस्वी यशाकडे…एक संघर्षशील जीवनप्रवास किरणभाऊ श्रीराम बागुल (चौधरी)
गरिबीच्या छायेतून तेजस्वी यशाकडे…एक संघर्षशील जीवनप्रवास किरणभाऊ श्रीराम बागुल (चौधरी)
काही माणसं जन्माला येतात ते इतिहास घडवण्यासाठी नाही, तर इतिहासाला माणुसकीची ओळख करून देण्यासाठी. असेच एक नाव म्हणजे किरण श्रीराम बागुल (चौधरी). आज ज्यांना संपूर्ण जिल्हा आदराने “भाऊ” म्हणून हाक मारतो, त्या किरणभाऊंचा जीवनप्रवास हा केवळ यशाचा नाही, तर संघर्ष, संयम, संस्कार, श्रम आणि सेवाभावाचा जिवंत दस्तऐवज आहे.
देवपूर, धुळे येथील नेहरूनगरच्या साध्याशा वस्तीमध्ये, दत्त जयंतीसारख्या पवित्र दिवशी त्यांचा जन्म झाला. जणू काही ईश्वरानेच ठरवले होते की, हा बालक पुढे जाऊन अनेकांच्या जीवनात दत्तासारखा आधार बनेल. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील पंचायत समितीत शिपाई. पगार तुटपुंजा, जबाबदाऱ्या मोठे. दोन भाऊ, एक बहीण, आणि सतत आजारपणाशी झुंज देणारे वडील. घरात चूल पेटवणं हेच रोजचं युद्ध होतं.
मोठ्या भावाने पान टपरी चालवून घराला हातभार लावला. पण वडिलांची प्रकृती साथ देत नव्हती. अशा वेळी आईने संसाराचा गाडा आपल्या मोलमजुरीच्या कष्टावर ओढला. उन्हातान्हात, हाताला फोड, पायाला भेगा पण चेहऱ्यावर तक्रार नाही. आई-वडिलांचे हे अथक कष्ट पाहून लहानगा किरण आतून हलला. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार पक्का झाला.“या गरिबीतून बाहेर पडायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.”
पैसे नाहीत, साधनं नाहीत, पण जिद्द अपार. जय हिंद शाळेत पायी चालत जाऊन दहावी-बारावी पूर्ण केली. पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यायला पैसे नव्हते. अनेकजण इथेच थांबतात… पण किरणभाऊ थांबले नाहीत. त्यांनी सायकलवर भाजीपाला विकण्याचं काम सुरू केलं. सकाळी भाजी, दुपारी अभ्यास, रात्री स्वप्नं. अशा संघर्षातून त्यांनी समाजशास्त्राची पदवी मिळवली. शिक्षण म्हणजे केवळ डिग्री नव्हे, तर जगण्याची दिशा हे त्यांनी तेव्हाच समजून घेतलं.
पुढे त्यांचं लग्न झालं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी, विश्वासाने खंबीर उभी राहणारी पत्नी त्यांच्या आयुष्यात आली. ही साथ म्हणजे त्यांच्या यशाचा एक मजबूत खांब ठरली. दोघांनी मिळून एक छोटंसं सायकल दुकान सुरू केलं. भांडवल कमी, पण प्रामाणिकपणा प्रचंड. मेहनतीची तयारी, ग्राहकांशी आपुलकी, आणि शब्दाला जागणं या गुणांमुळे व्यवसायाला हळूहळू बळ मिळालं.
याच काळात त्यांनी मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. लग्नकार्य असो, सामाजिक कार्यक्रम असो लोकांना केवळ सेवा नव्हे, तर समाधान मिळालं. नाव पसरलं, विश्वास वाढला. पाहता पाहता संपूर्ण जिल्ह्यात किरणभाऊंचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं. पुढे लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी केटर्सचा व्यवसाय सुरू केला. “आपण जे देतो, ते उत्तमच देणार” हा त्यांचा स्वभाव, लोकांच्या मनात घर करून गेला.
या प्रवासात त्यांना दोन मुले झाली. मोठा मुलगा चेतन (बी. फार्मसी) आणि लहान मुलगा धनंजय (बी.कॉम). स्वतःच्या कष्टातून उभं राहिलेलं शिक्षणाचं महत्त्व त्यांनी मुलांमध्ये रुजवलं. आज ही मुले वडिलांच्या कष्टांचा अभिमान बाळगून उभी आहेत.
२०१९ मध्ये त्यांच्या आयुष्यावर मोठा आघात झाला. वडिलांचं छत्र हरपलं. घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पण ज्याने आयुष्यभर संघर्ष पाहिला, तो खचत नाही.तो अधिक मजबूत होतो. आज ते अंबुजा, बिर्ला, वंडर, पोलाद अशा नामांकित सिमेंट कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्टर मीटिंग जेवणाची व्यवस्था पुरवीत आहेत आहेत.जळगाव, नंदुरबार, धुळे, नवापूरपर्यंत त्यांचा व्यवसाय विस्तारला. स्वतःच्या घामाच्या थेंबातून त्यांनी आपलं घर उभं केलं. आज त्यांच्या व्यवसायातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतोय.
समाजकार्याची ओढ त्यांना लहानपणापासूनच. ते केवळ यशस्वी उद्योजक नाहीत, तर संवेदनशील समाजसेवक आहेत. गोप्रेमी असलेल्या किरणभाऊंनी आतापर्यंत ३५ गाईंना कसायापासून वाचवलं. शेती घेऊन वडिलांच्या नावाने “श्रीराम गोवर्धन गोशाळा” सुरू केली. हे केवळ गोशाळा नाही, तर त्यांच्या संस्कारांचं प्रतीक आहे.
आजही त्यांच्या डोक्यावर आईचा आशीर्वाद आहे. खरंच, धन्य ती माऊली, जिने अशा रत्नाला जन्म दिला. विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.समाजातील अनेक पदे त्यांनी भूषवली, पण पदांपेक्षा माणूस म्हणून मिळालेला मान त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.
किरणभाऊ म्हणजे दिलदार मनाचा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता. यश मिळाल्यावर मागे वळून पाहणारा, आणि इतरांना हात देणारा माणूस. म्हणूनच आज लोक त्यांना नावाने नाही, तर आदराने “भाऊ” म्हणतात.
आज त्यांचा वाढदिवस. हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर प्रेरणेचा उत्सव आहे. संघर्षातून उभ्या राहिलेल्या, माणुसकी जपणाऱ्या, समाजाला देणं लागतो या भावनेने जगणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला मनःपूर्वक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
किरणभाऊ, तुमचं आयुष्य अनेक तरुणांसाठी दीपस्तंभ आहे. तुमचं कार्य असंच उजळत राहो, तुमचं नाव समाजात आदराने घेतलं जात राहो. हीच सदिच्छा!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा