निष्ठेचं ओझं आणि संधीसाधूपणाचं सिंहासन....!


निष्ठेचं ओझं आणि संधीसाधूपणाचं सिंहासन....!

चार वेळा पक्ष बदलणारा नेता आज व्यासपीठावर बसलेला असतो. त्याच्या गळ्यात हार, चेहऱ्यावर हास्य आणि हातात माईक असतो. त्याचा भूतकाळ कुणाला आठवत नाही, कारण वर्तमानात तो “उपयुक्त” असतो. पण त्याच व्यासपीठाच्या खाली, खुर्च्या लावणारा, चटई उचलणारा, झेंडे बांधणारा एक कार्यकर्ता उभा असतो—ज्याचं आयुष्य मात्र एकाच विचारावर खर्च झालेलं असतं.

हा कार्यकर्ता कधी बातम्यांत येत नाही. त्याच्यासाठी ना घोषणापत्र असतं, ना भाषणात नाव. तो फक्त आदेश पाळतो. सकाळपासून रात्रीपर्यंत पक्षासाठी धावतो. उन्हात भाजतो, पावसात भिजतो, पण मनात एकच अभिमान बाळगतो.“मी एकनिष्ठ आहे.”

पण या एकनिष्ठतेची किंमत फार मोठी असते. वर्षानुवर्षे त्याला सांगितलं जातं, “तुझा नंबर येईल.” तो वाट पाहतो. पुढचं पिढी मोठं होतं, काळ बदलतो, नेते बदलतात… पण त्याचा नंबर कधीच येत नाही. कारण तो कधीच पक्ष बदलत नाही. तो कधीच सौदेबाजी करत नाही. तो फक्त निष्ठावान राहतो.

आणि दुसरीकडे, जो कालपर्यंत विरोधात होता, जो विचारांवर नव्हे तर फायद्यावर विश्वास ठेवतो, तो आज पक्षात प्रवेश करतो. त्याला लगेच संधी मिळते. कारण त्याचं वजन असतं, आकडेमोड असते. त्याचं पक्षांतर “रणनीती” ठरतं, पण कार्यकर्त्याची निष्ठा “गृहीत” धरली जाते.

चटई उचलणाऱ्या हातांना कधी विचारलं जात नाही की ते थकले आहेत का. झेंडे लावणाऱ्या खांद्यांवरच पक्ष उभा असतो, पण त्याच खांद्यांवर सन्मानाचं ओझं ठेवायचं कुणाला सुचत नाही. निष्ठेचं आयुष्य मागे, आणि संधीसाधूपणाला पुढे असं हे चित्र हळूहळू सामान्य होत चाललं आहे.

ही केवळ राजकारणाची कथा नाही, ही माणसाच्या मूल्यांची कथा आहे. ज्या दिवशी एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो.“माझ्या निष्ठेची किंमत काय?” त्या दिवशी चळवळीची पायाभरणी हादरायला लागते.

कारण पक्ष बदलून येणारे चेहरे मंच सजवू शकतात, पण पक्ष उभा ठेवणारी माती ही चटई उचलणाऱ्या हातांनाच माहीत असते. आज गरज आहे ती निष्ठेला गृहीत न धरता तिला सन्मान देण्याची. नाहीतर उद्या चटई उचलायला कोणी उरणार नाही, आणि व्यासपीठं रिकामी पडतील.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !