स्वतःसाठी जगा कारण आयुष्याची हमी कुणाला ही नाही...!
स्वतःसाठी जगा कारण आयुष्याची हमी कुणाला ही नाही...!
कधी काय होईल, कोणाचा श्वास कुठे अडखळेल, कोणता क्षण जीवनाला वेगळं वळण देईल.हे कुणीच सांगू शकत नाही. माणसाचं वय वाढलं कीच मृत्यू येतो, हे ही गोष्ट खरी नाही. कित्येकदा उमलत्या वयातच वेळ हातातून निसटून जाते. म्हणूनच आयुष्य जितकं आहे, तितकं मनापासून, भरभरून आणि हसतमुखाने जगायला हवं.
आपण रोज धावत असतो.नोकरी, जबाबदाऱ्या, लोकांच्या अपेक्षा, समाजाची भीती… आणि यात स्वतःचा आनंद, स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवत जातं. आपण इतरांच्या आनंदासाठी रात्रंदिवस झटतो, पण स्वतःसाठी एक क्षणही काढत नाही.
परंतु, सत्य इतकंच कडू आणि तितकंच स्पष्ट आहे.
आपल्यावर कितीही प्रेम करणारं मन असलं, तरी शेवटचा प्रवास आपणच एकटे करतो.सोबत काहीही जात नाही.न संपत्ती, न मानमरातब, न जगाची स्तुती. आणि नाही जात ते लोक, ज्यांच्यासाठी आपण स्वतःला विसरून जगलो.मग हे सगळं कशासाठी? फक्त इतरांना खुश करण्यासाठी, की स्वतःच्या मनाला कायम शांत ठेवण्यासाठी?
म्हणूनच स्वतःसाठी जगा.जगण्याची मजा इतरांकडून नाही, तर स्वतःकडून घ्यायला शिका.स्वतःला हवं ते करा, मनाला आवडेल तसं जगा, कारण उद्याचा श्वासही आपला आहे याची खात्री नसते.
आनंद मोठा असावा असं नाही.कधी कधी छोट्यातला छोटा क्षणही आयुष्य बदलून जातो.एकटं बसून घेतलेला चहाचा घोट, जुने गाणं ऐकताना डोळ्यात आलेलं पाणी, शांत संध्याकाळ, कुणाशीतरी मनापासून झालेली दोन मिनिटांची गप्पा… हेच क्षण मनाला जगायला शिकवतात.
आज जो दिवस आहे, तोच खरा आहे.उद्याचं काहीच निश्चित नाही.म्हणून मनातल्या मनात एक वचन द्या.
आता पुढे मी स्वतःला विसरणार नाही.मी जगेन
माझ्यासाठी, माझ्या स्वप्नांसाठी, आणि माझ्या आनंदासाठी.कारण शेवटी फक्त एकच गोष्ट महत्वाची ठरते.जगलेलं आयुष्य, आणि त्यातल्या आठवणी.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा