एकटेपणाची जाणीव होणं…..!
एकटेपणाची जाणीव होणं…..!
एकटेपणाची जाणीव होणं…हे तुझं हरलेपण नाही.
इतरांना सतत जपत, त्यांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या जगण्याला आधार बनत तू अनेक वर्षे चालत राहिलास. पण त्या वाटचालीत तू स्वतःला कुठेतरी हरवून बसलास. आज तुला स्वतःला एकटा असल्याची जाणीव होतेय, पण खरं सांगायचं तर हे एकटेपण दुसऱ्यांनी निर्माण केलेलं नाही… ते तुझ्या थकलेल्या मनाने सोडलेल्या हाका आहेत.
कधीकाळी खूप जवळचे वाटणारे लोक सरड्यासारखे रंग बदलून गेले. त्यांच्या बदल्यातून उमटलेली रिक्तता, त्यांची अनुपस्थिती,आणि त्यांच्या वागण्याच्या जखमा यांनीच तुला सर्वाधिक थकवलं. ते तुझ्या सोबत नाहीत म्हणून तू एकटा नाहीस… तू एकटा वाटतो आहेस, कारण तू खूप काही मनात साठवून ठेवलेलं आहेस.
पण यातील खरा आधार, खरी शक्ती…ती इतर कोणात नसून तुझ्यातच आहे.जगाला जपण्याच्या ओझ्यात स्वतःला विसरून जाण्यापेक्षा,आतल्या तुझ्या त्या छोट्याशा, कोमल पण अढळ अस्तित्वाला कवटाळ.तो तू जो शांत आहे, थोडा दुखावलेला आहे, पण अजूनही आतून प्रचंड मजबूत आहे.
कुणी नसले तरी फरक पडत नाही…कारण स्वतःची साथ सर्वात खरी, शाश्वत आणि न तुटणारी असते.स्वतःवर प्रेम करायला शिक…जे तुटलं, जे दूर गेलं, त्याचा हिशोब ठेवत मनाला कोमेजू देऊ नकोस.जगायचं आहे आजच्या स्वप्नांसह त्यांना पाणी दे, आशेचा सूर्य दे, आणि वाढू दे.
लक्षात ठेव…तू खरोखर कधीच एकटा नसतोस.तुझ्या आत एक असा प्रकाश आहे,जो कितीही अंधार झाला तरी विझत नाही.तुझ्यातली शक्ती, तुझ्यातलं स्वप्न, तुझ्यातली ओढ हेच तुझं खऱ्या अर्थाने घर आहे.
म्हणून मनावरचं धुकं हलकं कर…डोळ्यांतला थकवा पुस…आणि पुन्हा स्वतःकडे परत ये.
कारण जगाकडून काय मिळालं हे महत्त्वाचं नसतं,
पण स्वतःकडून काय हरवलं आणि काय परत मिळवलं
यावर तुझी खरी ओळख ठरते.तू एकटा नाहीस…तू तुझ्यासोबत आहेस.आणि ती साथच सर्वात मजबूत आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा