अस्तित्वाची जाणीव जगण्याची सुरुवात....!

अस्तित्वाची जाणीव जगण्याची सुरुवात....!

आयुष्य प्रत्येकालाच मिळतं, पण स्वतःचं अस्तित्व ओळखून ते ठामपणे जगणं हे फार थोड्यांना जमतं. जगात वावरत असताना आपण आहोत, हे केवळ आपल्याला माहीत असणं पुरेसं नसतं; तर आपण कोण आहोत, हे जगाला कळणंही तितकंच गरजेचं असतं. कारण आयुष्यात स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही, ही वास्तवाची कडू पण खरी बाजू आहे.

बर्‍याचदा आपण आयुष्याला दोष देतो.परिस्थिती अशी होती, वेळ योग्य नव्हता, नशिबातच नव्हतं. पण खरं तर आयुष्य आपल्याला संधी देत असतं; निर्णय घ्यायचं धैर्य मात्र आपणच गमावतो. आयुष्याचे सगळेच निर्णय जर आयुष्यावर सोडून दिले, तर माणूस फक्त श्वास घेत राहतो… पण मनापासून जगत नाही. कारण निर्णय न घेणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची सूत्रं कुण्या दुसऱ्याच्या हातात देणं.

स्वतःसाठी उभं राहणं सोपं नसतं. चुका होतील, अपयश येईल, लोक टीका करतील. पण त्या सगळ्यातूनच माणूस घडत असतो. जो पडूनही उभा राहतो, जो स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने जगायला शिकतो. जगात आवाज त्याचाच ऐकला जातो, जो आधी स्वतःच्या मनाचा आवाज ऐकतो.

अस्तित्व सिद्ध करणं म्हणजे इतरांपेक्षा मोठं होणं नाही; तर स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत ओळखणं आहे. स्वतःच्या भावनांना महत्त्व देणं, स्वतःच्या विचारांना दिशा देणं आणि स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेणं  हाच आत्मसन्मान आहे. अन्यथा आयुष्य हळूहळू हातातून निसटत जातं आणि आपण केवळ प्रेक्षक बनून राहतो.

आयुष्य थांबत नाही, ते सतत पुढे जात असतं. प्रश्न विचारत असतं, आव्हानं देत असतं. त्या प्रत्येक वळणावर जर आपण स्वतःला घडवलं, स्वतःचा ठसा उमटवला, तरच आयुष्याला अर्थ मिळतो. नाहीतर माणूस फक्त जिवंत राहतो, पण जगण्याचा आनंद हरवून बसतो.

म्हणूनच, स्वतःचं अस्तित्व ओळखा, स्वतःसाठी निर्णय घ्या आणि आयुष्याला दिशा द्या. कारण जगणं हे नशिबावर सोडून देण्यासारखं नाही; ते रोज स्वतःच्या प्रयत्नांनी घडवायचं असतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !