अहंकारात हरवलेली माणुसकी....!
अहंकारात हरवलेली माणुसकी....!
कपटी माणसाचा मार्ग सुरुवातीपासूनच घाणेरडा असतो. तो चालतो तेव्हा पायाखालची मातीच नव्हे, तर आजूबाजूची नातीही मळकट होतात. बाहेरून हसरा, गोड बोलणारा, पण आतून स्वार्थाच्या विळख्यात अडकलेला असा हा माणूस सत्याशी कधीच प्रामाणिक नसतो. त्याच्या प्रत्येक पावलामागे एखादा डाव, एखादी लपलेली अपेक्षा असते. विश्वास त्याच्यासाठी साधन असतो, मूल्य नव्हे.
अहंकाराच्या आंधळेपणात त्याला स्वतःची चूक कधीच दिसत नाही. कारण चूक पाहण्यासाठी डोळ्यांपेक्षा मन स्वच्छ असावं लागतं. “मीच योग्य” या गर्वाच्या कवचात तो इतका गुरफटतो की समोर उभं असलेलं सत्य ही त्याला धूसर दिसतं. कोणी आरसा दाखवला तर तो आरसा फोडतो; पण चेहऱ्यावरची मळ पुसण्याचा विचार करत नाही. सल्ला त्याला अपमान वाटतो, आणि सुधारणा त्याला कमजोरी वाटते.
कपटी माणूस इतरांसाठी खड्डे खोदताना थकत नाही. कधी शब्दांनी, कधी डावपेचांनी, तर कधी खोट्या कथा रचून तो इतरांना अडचणीत आणतो. त्याला वाटतं
आपण फार हुशार आहोत, आपली खेळी कुणालाच कळणार नाही. पण काळ हा सर्वांत मोठा साक्षीदार असतो. तो शांतपणे पाहत राहतो आणि योग्य क्षणी सत्य उघडं करतो.
शेवटी तो स्वतःच खोदलेल्या खड्ड्यात पडतो.ही पडझड अचानक नसते; ती आतून सुरू झालेली असते. आधी नात्यांमध्ये दुरावा येतो, मग विश्वास तुटतो, आणि शेवटी माणूस एकटा पडतो. जेव्हा आजूबाजूला कोणी उरत नाही, तेव्हा अहंकाराचं ओझं असह्य होतं. त्या क्षणी उमगतं.आपण जिंकलो नाही, तर स्वतःलाच हरलो आहोत.
ही कथा फक्त कपटी माणसाची नाही, तर माणुसकीची आठवण करून देणारी आहे. स्वच्छ मनाने चाललेला मार्ग कदाचित कठीण असेल, पण तो नात्यांनी समृद्ध असतो. नम्रतेत शक्ती असते, आणि सत्यात शांती. कारण शेवटी टिकून राहतो तो डावपेच नव्हे, तर प्रामाणिकपणा. आणि खड्डे खोदणारा माणूस पडतोच; पण पूल बांधणारा माणूस कायम आठवणीत राहतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा