चाफलूसी करणारा माणूस…..!


चाफलूसी करणारा माणूस…..!

चाफलूसी करणारा माणूस समोर गोड बोलतो, पण त्या गोड शब्दांमध्ये माणुसकीपेक्षा स्वार्थ जास्त दडलेला असतो. त्याची भाषा मधाळ असते, वागणूक आपुलकीची वाटते, पण त्या आपुलकीला खोलवर मुळं नसतात. तो तुमचं कौतुक मनापासून करत नाही, तर स्वतःच्या फायद्याचा हिशेब मांडत असतो. म्हणूनच त्याच्या प्रत्येक वाक्यामागे एखादी अपेक्षा, एखादा हेतू शांतपणे लपलेला असतो.

अशा लोकांना तुमची किंमत नसते, त्यांना फक्त तुमची गरज असते. तुम्ही उपयोगी आहात तो पर्यंत ते तुमच्या भोवती असतात, तुमचं महत्त्व वाढवतात, तुमच्या कानावर गोड शब्दांची बरसात करतात. पण ज्या दिवशी ती गरज संपते, त्या दिवशी त्यांचं बोलणं बदलतं, वागणूक बदलते आणि शेवटी ते आपोआप दूर जातात. ते निघून जातात तेव्हा फक्त एक पोकळी उरते.कारण आपल्याला कळतं की आपली साथ नव्हे, तर आपला उपयोगच महत्त्वाचा होता.

चाफलूसी क्षणभर समाधान देते.मन सुखावतं, अहंकाराला थोडं बळ मिळतं. पण हे समाधान क्षणिक असतं.कारण जिथे खोट्या शब्दांचा आधार असतो, तिथे विश्वास टिकत नाही. विश्वास हा वेळ, प्रामाणिकपणा आणि कठीण प्रसंगातून तयार होतो.गोड बोलण्यातून नाही.

खरी माणसं याच्या अगदी उलट असतात. ती थेट बोलतात. कधी त्यांच्या शब्दांनी मन दुखतं, कधी ते कठोर वाटतात. पण त्यांच्या मनात कपट नसतं. ते तुमच्या चुका दाखवतात, कारण त्यांना तुमचं भलं हवं असतं. ते कौतुक कमी करतात, पण साथ मात्र खरी देतात. त्यांच्या शब्दांत गोडवा नसेल, पण त्यांच्या कृतीत सचोटी असते.

आजच्या आयुष्यात गोड बोलणारे खूप आहेत, पण खरं बोलणारे फार कमी. म्हणूनच ते कमी असून ही जास्त मौल्यवान ठरतात. गोड शब्द देणारे गर्दीत दिसतात, पण कठीण वेळी तुमच्या शेजारी उभं राहणारे फार थोडे असतात. आणि तेच खरं नातं ओळखून देतात.

म्हणून आयुष्यात कौतुक ऐकताना कान उघडे ठेवा, पण डोळेही उघडे ठेवा. शब्द ऐकताना भावना ओळखा, बोलण्यापेक्षा वागणूक पाहा. कारण प्रत्येक गोड शब्दामागे प्रामाणिक भावना असतेच असं नाही. कधी कधी शांत राहून साथ देणारा माणूसच सर्वात जास्त आपला असतो.

चाफलूसी ओळखता आली की माणूस फसणं थांबवतो. तो नात्यांची निवड शब्दांवर नाही, तर कृतीवर करायला शिकतो. आणि तेव्हाच आयुष्य सुटसुटीत होतं.कारण खोट्या लोकांची गर्दी कमी होते आणि योग्य माणसं आपोआप जवळ येतात. अशा माणसांसोबतच आयुष्य खर्‍या अर्थाने सुंदर वाटू लागतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !