हसण्यामागे लपलेली वेदना.....!
हसण्यामागे लपलेली वेदना.....!
सगळ्यासमोर हसणारी माणसं पाहिली की वाटतं, यांना कसलंच दुःख नसावं.आयुष्य किती सहज घेत असतील, किती आनंदात असतील! पण खरं तर हे हसू अनेकदा आनंदाचं नसतंच. ते असतं वेदना लपवण्यासाठी घातलेलं एक शांत कवच.
ही माणसं आपलं दुःख कधीच ओरडून सांगत नाहीत. कुणाला त्रास होऊ नये, कुणावर ओझं पडू नये म्हणून ती स्वतःला मजबूत दाखवतात. आतून रडायचं असतं, मन भरून आलेलं असतं, तरी ओठांवर हसू ठेवतात. कारण तक्रार करणं त्यांना जमत नाही. “आपणच सावरायचं” ही सवय त्यांना लवकर शिकवलेली असते.
ती सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांसोबत हसतात, प्रत्येकाला आपलंसं करतात. पण स्वतःबद्दल बोलायची वेळ आली की थांबतात. कुणासमोरही पूर्णपणे उघडत नाहीत. कारण त्यांना वाटतं, आपलं दुःख कुणाला समजणारच नाही. त्यांचा संघर्ष खूप शांत असतो.
शब्दांशिवाय,आवाजांशिवाय. म्हणूनच तो कुणाला दिसत नाही.
अशा माणसांना खरंतर सर्वात जास्त गरज असते. आधाराची, समजुतीची, मायेच्या एका साध्या शब्दाची. पण तेच लोक तो आधार कधीच मागत नाहीत. कारण मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही, हे मान्य करायला त्यांना वेळ लागतो. हसण्यामागे थकवा दडलेला असतो, पण तरी ही ते “मी ठीक आहे” असंच म्हणत राहतात.
सगळ्यांना समजून घेणारा माणूस अनेकदा स्वतः मात्र न समजलेला राहतो. सगळ्यांसाठी वेळ काढणारा माणूस स्वतःसाठी कुणालाच नसल्याची जाणीव मनात खोलवर घर करून बसते. आणि मग तो अधिकच शांत होतो. कारण कधी कधी शांतता ही समाधानाची नसून, आतून तुटण्याची निशाणी असते.
म्हणून सगळ्यासमोर हसणाऱ्या माणसाकडे कधीही हलकं घेऊ नका. त्यांच्या हसण्यामागे किती युद्धं सुरू असतील, हे आपल्याला माहीत नसतं. तेच लोक अनेकदा एकटे लढत असतात.कुणाला ही न सांगता, कुणाकडून अपेक्षा न ठेवता. आणि खरंच, कधी कधी सगळ्यात शांत माणूसच आतून सर्वात जास्त तुटलेला असतो.
आजूबाजूला असं कुणी दिसलं, तर फक्त एकदा मनापासून विचारा,“खरंच ठीक आहेस ना?”कदाचित त्या एका प्रश्नातच त्यांना जगण्याचं थोडंसं बळ मिळेल.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा