इतरांसाठी जगताना माणूस....!
इतरांसाठी जगताना माणूस....!
सगळ्यांची मनं जपताना माणूस हळूहळू स्वतःचंच मन हरवून बसतो. सुरुवातीला ते त्याला जाणवत ही नाही. कारण तो चांगुलपणाच्या भ्रमात असतो. “समोरच्याला वाईट वाटू नये”, “कोणी दुखावलं जाऊ नये” या विचारांनी तो स्वतःच्या भावनांवर पडदा टाकतो. हसणं सवय होतं, जरी आत कुठेतरी मन रडत असलं तरी.
आपण सतत इतरांच्या अपेक्षांचं ओझं वाहत असतो.
कुणासाठी वेळ काढतो,कुणासाठी स्वतःची मतं बदलतो, तर कुणासाठी गप्प राहणं स्वीकारतो. स्वतःला समजून घ्यायला वेळच उरत नाही.आपल्या थकव्याला ही आपण नाव देत नाही, कारण “आपणच मजबूत आहोत” असं स्वतःलाच समजावत राहतो.
हळूहळू स्वतःचं सुख दुय्यम ठरतं. स्वतःच्या गरजा ‘नंतर पाहू’ या कपाटात बंद होतात. आपण सगळ्यांसाठी उपलब्ध असतो, पण स्वतःसाठी कधीच नसतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हे सगळं करताना आपण स्वतःला दोष देत नाही, तर अभिमान बाळगतो की “मी सगळ्यांना सांभाळतो.”
पण एक दिवस असा येतो, जेव्हा मन प्रचंड थकतं. त्या थकव्याला कुठलीही विश्रांती मिळत नाही. कारण आपली किंमत आपल्या असण्यावर नाही, तर आपल्या देण्यावर मोजली जात असते. काही लोक तुमच्या उपस्थितीपेक्षा तुमच्या उपयोगावर प्रेम करत असतात. आणि हे सत्य उशिरा का होईना, पण खूप खोलवर जखम करून जातं.
तेव्हा लक्षात येतं सगळ्यांची जबाबदारी आपली नसते. सगळ्यांना खूश ठेवणं ही जबाबदारी तर मुळीच नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण स्वतःला संपवत असतो, आणि तरीही शेवटी अपुरेच ठरतो.
स्वतःसाठी उभं राहणं तेव्हा गरजेचं ठरतं. ‘नाही’ म्हणायला शिकणं ही कमजोरी नाही, ती आत्मरक्षणाची पहिली पायरी असते. स्वतःची मर्यादा ठरवणं म्हणजे कठोर होणं नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान करणं असतं.
कधी तरी स्वतःला निवडणं स्वार्थ नसतं. ते स्वतःवरचं खरं, प्रामाणिक प्रेम असतं. कारण जो माणूस स्वतःला समजून घेत नाही, तो इतरांना ही खरं प्रेम देऊ शकत नाही.
म्हणूनच, सगळ्यांची मनं जपताना स्वतःचं मन हरवू नका. कारण तुम्हीही तितकेच महत्त्वाचे आहात. तुमचं हसणं खोटं नसावं, तुमचं शांत राहणं मजबुरीचं नसावं, आणि तुमचं जगणं फक्त इतरांसाठीच नसावं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा