दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला नको....!

दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला नको....!

आपली चूक नसताना स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःलाच देणं असतं. हे वाक्य ऐकायला सोपं वाटतं, पण जगताना त्याची जाणीव फार उशिरा होते. मन संवेदनशील असतं तेव्हा ते इतरांच्या शब्दांना, वागणुकीला जास्त खोलवर घेतं. आणि मग नकळत आपण स्वतःलाच दोषी ठरवायला लागतो.

खरं तर सगळंच आपल्या हातात नसतं. प्रत्येक माणूस, प्रत्येक नातं, प्रत्येक परिस्थिती आपल्या अपेक्षांप्रमाणे वागेलच असं नाही. हे स्वीकारणं कठीण असतं, पण हेच स्वीकारणं परिपक्वतेचं आणि शहाणपणाचं लक्षण आहे. लोक जेव्हा चुकीचं वागतात, तेव्हा त्या वागणुकीमागे आपला स्वभाव नसतो, तर त्यांच्या विचारांची मर्यादा असते. पण तरीही आपण आरशात पाहून स्वतःलाच प्रश्न विचारतो.“मी वेगळं वागायला हवं होतं का?”

प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच जबाबदार धरणं मनाला हळूहळू थकवतं. आपण प्रामाणिक असतो, मनापासून वागतो, कुणाचं वाईट नको असतं.मग अशा वेळी मन शांत ठेवण्याचा हक्क आपलाच असतो. तरीही आपण तो हक्क स्वतःकडूनच हिरावून घेतो. सगळ्यांना समजावून सांगण्याच्या नादात आपण स्वतःला विसरतो. पण खरं सांगायचं तर काही लोक समजून न घेण्यासाठीच ठरलेले असतात. त्यांच्यासमोर कितीही सत्य मांडलं तरी ते ऐकण्यास तयार नसतात.

आपली बाजू स्वच्छ असेल तर सतत स्पष्टीकरण देत बसण्याची गरज नसते. शब्द कमी पडतात तिथे वेळ बोलतो. वेळ आणि सत्य यांची जोडी कुणालाही चुकत नाही. आज नाही तर उद्या, पण सत्य स्वतःच आपलं स्थान मिळवून देतं. उगाचच मनात अपराधभावना बाळगणं म्हणजे स्वतःशीच अन्याय करणं आहे. आपण इतरांना समजून घेतो, माफ करतो, त्यांच्यासाठी थांबतो.पण स्वतःसाठी थोडी माया ठेवायला आपण विसरतो.

स्वतःचा सन्मान स्वतःच जपायला हवा. कारण जग तुमचं मूल्य ठरवण्याआधी तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता, हे जास्त महत्त्वाचं असतं. आपली चूक नसताना शांत राहणं म्हणजे पळ काढणं नाही, तर स्वतःला जपण्याचा निर्णय आहे. ही शांतता कमकुवतपणाची नाही, तर आत्मविश्वासाची, आत्मसन्मानाची आणि अंतःकरणाच्या बळाची निशाणी आहे.कारण शेवटी, आपली चूक नसताना शांत राहणं.हीच खरी ताकद असते.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !