क्षणभराची भेट,जन्मभराची आठवण....!
क्षणभराची भेट,जन्मभराची आठवण....!
आयुष्य म्हणजे असंख्य भेटींची गुंफण. काही माणसं आपल्यासोबत चालत राहतात, तर काही फक्त क्षणभरच भेटतात. पण या क्षणभरच्या भेटीतही जर आपल्या स्वभावाचा सुगंध दरवळला, तर ती भेट काळाच्या ओघातही पुसली जात नाही. कारण माणूस चेहरा नाही आठवत, तो आठवतो तो भाव.
स्वभाव म्हणजे केवळ बोलण्याची शैली नव्हे, तर तो आपल्या मनाचा आरसा असतो. एखाद्याशी दोन शब्द बोलताना त्याला दिलेला मान, त्याच्या डोळ्यांत पाहून केलेलं संवाद, आणि त्याच्या भावनांना दिलेली किंमत
यातूनच आपला स्वभाव उमटतो. क्षणभर भेटलेला माणूसही जर आपल्या वागण्यात आपलेपणा अनुभवला, तर तो आपल्याला आयुष्यभर विसरू शकत नाही.
कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या डोळ्यांत दुःख दिसतं, आणि आपण त्याला फक्त “काही हरकत नाही, सगळं ठीक होईल” एवढंच म्हणतो. पण त्या एका वाक्याने त्याच्या मनाला आधार मिळतो. अशा छोट्या शब्दांतून, छोट्या कृतीतून आपण नकळत कुणाच्या आयुष्यात आशेचा दिवा लावतो.
स्वभाव सुंदर असणे म्हणजे नेहमीच गोड बोलणे नव्हे. कधी कधी शांतपणे ऐकणे, वेळेवर मदतीचा हात पुढे करणे, किंवा कुणाला कमी न लेखता समजून घेणे.हेच खरे सौंदर्य असते. अहंकाराने बोललेले हजार शब्द विसरले जातात, पण नम्रतेने बोललेले दोन शब्द जन्मभर लक्षात राहतात.
जग आज खूप व्यस्त आहे. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात गुंतलेला आहे. अशा धावपळीच्या जगात जर तुमचा स्वभाव कुणाला थांबवून हसायला लावतो, विचार करायला भाग पाडतो, किंवा मनाला शांतता देतो.तर तुम्ही खऱ्या अर्थाने समृद्ध आहात.
म्हणून स्वभाव जपा. कारण पद, पैसा, प्रसिद्धी ही सगळी क्षणिक असते; पण स्वभावातून दिलेली माणुसकी चिरंतन असते. स्वभाव असा ठेवा की, क्षणभर भेटलेला माणूस ही आयुष्यभर म्हणत राहील
“तो/ती माणूस फार वेळ भेटला नाही, पण मनात कायमचा घर करून गेला.”
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा