स्वतःचा निर्णय…..!

स्वतःचा निर्णय…..!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सल्ले देणारे अनेकजण भेटतात.कोणी आपुलकीने,कोणी अनुभवाच्या जोरावर, तर कोणी केवळ बोलण्यापुरते. सल्ला देणं खूप सोपं असतं, कारण त्या मागे जबाबदारी नसते. पण जेव्हा त्या सल्ल्याचे परिणाम भोगायची वेळ येते, तेव्हा मात्र सगळेच मागे हटतात. कारण त्या निर्णयाचं ओझं,त्या चुकांची वेदना आणि त्या यशाचं वजन शेवटी आपल्यालाच वाहावं लागतं.

प्रत्येक माणूस आपापल्या अनुभवाच्या चष्म्यातूनच आपल्याला जग दाखवत असतो. त्याचा अनुभव चुकीचा नसतो, पण तो आपला अनुभव ही नसतो. आपली परिस्थिती, आपली वेदना, आपली स्वप्नं आणि आपली मर्यादा हे सगळं वेगळं असतं. म्हणूनच कोणाला ही पूर्णपणे आपली जागा घेता येत नाही. आपण काय सहन करतोय, काय गमावतोय किंवा काय मिळवू शकतोय हे खरं तर आपल्यालाच माहीत असतं.

निर्णय घेताना चूक होण्याची भीती सगळ्यांनाच वाटते. पण चूक न करता शिकलेला धडा फार काळ टिकत नाही. चुकून शिकलेला धडा मात्र आयुष्यभर साथ देतो. धाडसा शिवाय यश मिळत नाही, आणि अपयशा शिवाय अनुभव येत नाही. जे कधीच धोका घेत नाहीत,ते कधीच स्वतःला ओळखू शकत नाहीत.

लोक आज सल्ला देतील, उद्या विसरतील.पण तुमचा निर्णय मात्र तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतो.आज घेतलेला एक निर्णय उद्याचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून निर्णय घेताना सगळ्यांचं ऐका, विचार करा, पण शेवटी स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिका.कारण स्वतःवर विश्वास ठेवून घेतलेला निर्णय कधीच लाजिरवाणा ठरत नाही, तो चुकला तरी तो तुमचा असतो.

आयुष्य म्हणजे केवळ यशाची कहाणी नाही, तर धाडस, चुकांची कबुली आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद यांचा प्रवास आहे. शेवटी जळायचंही तुम्हालाच असतं आणि उजळायचंही तुम्हालाच. म्हणून लोकांच्या मतांवर नव्हे, तर स्वतःच्या विश्वासावर उभं राहायला शिका. कारण अनुभव दुसऱ्याचा असू शकतो, पण आयुष्य मात्र पूर्णपणे तुमचंच असतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !