गरज संपली की माणसं बदलतात…..!
गरज संपली की माणसं बदलतात…..!
“गरज संपली की माणसं बदलतात” हे वाक्य आपण ऐकलेलं असतं; पण जोपर्यंत आयुष्य स्वतः ते शिकवत नाही, तोपर्यंत त्यामागची खोल वेदना उमगत नाही. अनुभवाच्या वाटेवर चालताना कळतं की हे शब्द केवळ वाक्य नसून, वास्तवाचं एक बोचणारं सत्य आहे. आणि जेव्हा हे सत्य आपल्याच जवळच्या माणसांकडून समोर येतं, तेव्हा वेदना अधिक तीव्र होतात, कारण अपेक्षांची मुळे तिथेच खोलवर रुजलेली असतात.
उपयोग असे पर्यंत मायेची भाषा, हक्काची वागणूक आणि आपुलकीची उब लाभते. मात्र गरज संपताच तेच नाते थंड होतं, आणि अंतर नकळत वाढू लागतं. कोणी थेट दुखावत नाही, शब्दांनी जखम करत नाही; पण दुर्लक्षाची शांतता असंख्य वेदना बोलून दाखवते. तेव्हा जाणवतं की माणसं बदलली नाहीत, तर वेळेने त्यांच्या खऱ्या स्वभावावरचा पडदा दूर केला आहे.
नात्यांची किंमत केवळ गरजेनुसार ठरवणारी माणसं कधीच आपली नसतात. ती आपल्या आयुष्यातील एखाद्या टप्प्यापुरतीच सोबत असतात. विश्वास तुटतो तेव्हा कुठला ही आवाज होत नाही.ना रडणं,ना ओरडणं. मात्र मनाच्या आत काहीतरी कोसळतं; एक आधार, एक आपुलकी, एक भ्रम.त्या तुटलेल्या विश्वासाच्या अवशेषांतून स्वतःला पुन्हा सावरण्यास वेळ लागतो.
खरं पाहता, प्रश्न दुसऱ्यांच्या वागण्याचा नसतो; प्रश्न असतो आपण दिलेल्या जागेचा. आपणच कुणाला गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिलेलं असतं, स्वतःपेक्षा वरचं स्थान बहाल केलेलं असतं. आणि जेव्हा तीच माणसं दूर जातात, तेव्हा मनात निर्माण होणारी पोकळी अधिकच बोचरी वाटते.
वेळ मात्र आपलं काम निष्ठेने करतो. तो हळूहळू आयुष्यातील माणसं गाळून टाकतो. जे फक्त गरजे पुरते होते, ते निघून जातात; आणि जे खऱ्या अर्थाने आपले असतात, ते कोणत्या ही परिस्थितीत ठामपणे थांबतात. हे गाळणं वेदनादायक असलं, तरी तेच वेळेचं आपल्यावरचं मोठं उपकार असतं.
सगळे दूर गेले, तरी स्वतःशी प्रामाणिक राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. स्वतःच्या मूल्यांशी, स्वभावाशी आणि अंतर्मनाशी कधीही तडजोड करू नये.ज्यांनी साथ
सोडली, त्यांनी आयुष्याचा कठोर धडा दिला; आणि जे थांबले, त्यांनी आयुष्याला अर्थ दिला. दोघांचं ही स्थान आहे.एकाने शहाणपण शिकवलं, तर दुसऱ्याने माणुसकीवरचा विश्वास टिकवून ठेवला.
वेदना कायम स्वरूपी नसतात. काळ जखमांवर हळूहळू मलम लावतो. मात्र त्या वेदनांतून मिळालेलं शहाणपण आयुष्यभर सोबत राहतं. म्हणूनच माणसं बदलली म्हणून खचून जायचं नसतं, स्वतःला दुर्बल समजायचं नसतं. अशा अनुभवांतून अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि अधिक आत्मनिर्भर व्हायचं असतं.
कारण शेवटी एकच सत्य उरतं माणसं येतात आणि जातात,पण स्वतःवरचा विश्वास टिकवणं हेच खरं यश असतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा