धाग्यांत गुंफलेली नाती....!


धाग्यांत गुंफलेली नाती....!

मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात.डोळ्यांना दिसणारही नाहीत इतके नाजूक. एखादा शब्द जरा जास्त झाला, एखादी भावना न बोलता मनात साचली, की त्या धाग्यांवर ताण पडतो. खरंच, तुटायचंच असेल तर श्वासाएवढाही झोत पुरेसा असतो. एक दुर्लक्ष, एक “नंतर बोलू” म्हणत टाळलेला क्षण, आणि मैत्रीच्या विणीत नकळत भेग पडते.

पण हेच धागे जेव्हा विश्वासाने विणलेले असतात, तेव्हा ते लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत ठरतात. आयुष्य कितीही बदललं, अंतर कितीही वाढलं, संकटं कितीही कोसळली.तरीही ते धागे तुटत नाहीत. वज्राघात झाला तरी ते सहन करतात, कारण त्यात फक्त आठवणी नसतात, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होण्याची शांत तयारी असते.

मैत्री म्हणजे रोज बोलणं नव्हे, तर वर्षांनंतर भेटून ही तेच जुने हसू ओठांवर येणं. ती मोठ्या आश्वासनांत नसते, तर साध्या “मी आहे” या वाक्यात असते.यशात आनंदाने टाळ्या वाजवणं आणि अपयशात शब्दांशिवाय सोबत करणं.हीच खरी मैत्री. ती कधी आवाज करते, तर कधी फक्त शांतपणे शेजारी बसून राहते.

तुटलेली मैत्री पुन्हा जुळू शकते, पण त्यावरची गाठ मनाला बोचत राहते. म्हणूनच या धाग्यांना जपावं लागतं थोड्या माफीनं, थोड्या समजुतीनं, आणि भरपूर आपुलकीनं. कारण मैत्री टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; मन मोठं असणं पुरेसं असतं.

शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं.मैत्रीचे धागे दिसत नाहीत, पण तेच आपल्याला आयुष्यभर घट्ट धरून ठेवतात. ते नाजूक आहेत म्हणून जपायचे, आणि मजबूत आहेत म्हणून त्यांच्यावर निस्सीम विश्वास ठेवायचा. कारण तुटले तर श्वासाने ही तुटतात, आणि जपले तर वज्राघाताला ही तोंड देतात. 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !