एक दिलदार मनाचा दिलदार माणूस… कायमचा हरपला...!


एक दिलदार मनाचा दिलदार माणूस… कायमचा हरपला...!

एरंडोल येथील प्रा. आर. एस. पाटील सर यांचे आज रात्री हृदयविकाराने दुःखद निधन झाले आणि क्षणात एरंडोलच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनातील एक उजळ प्रकाश मावळला. ही बातमी केवळ दुःखद नाही, तर मन सुन्न करणारी आहे. काही व्यक्ती केवळ त्यांच्या नावामुळे ओळखल्या जात नाहीत, तर त्यांच्या माणुसकीमुळे, कार्यामुळे आणि जिवंत आठवणींमुळे कायमस्वरूपी मनात घर करून राहतात. प्रा.पाटील सर हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते.

विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख सर्वदूर होती; मात्र ते फक्त शिक्षक नव्हते.ते विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि “आपणही काही तरी करू शकतो” ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजवली. वर्गात ते शिक्षक होते, तर वर्गाबाहेर विद्यार्थ्यांसाठी पालक, मार्गदर्शक आणि अनेकांसाठी तर खरे आधारवड होते.

गरिबीमुळे कोणाच्या ही शिक्षणात खंड पडू नये, ही त्यांची आंतरिक तळमळ होती. अनेक गरीब विद्यार्थ्यांची फी त्यांनी स्वतः भरली; परंतु कधीही त्याचा गाजावाजा केला नाही. “मदत केली” हे त्यांच्या शब्दकोशात नव्हते.
ते त्याला आपले कर्तव्य समजत. एखादा विद्यार्थी अडचणीत आहे, हे कळताच त्यांचे मन स्वस्थ बसत नसे; त्या विद्यार्थ्याची चिंता हीच त्यांची चिंता बनत असे.

त्यांचे व्यक्तिमत्त्व सतत धडपडणारे, संवेदनशील आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा होती. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग माणुसकीच्या अधिष्ठानावर आधारित होता. राजकारणात असताना ही त्यांनी दिलदारपणा आणि संवेदना कधीही सोडल्या नाहीत. सत्तेपेक्षा माणूस मोठा असतो, हे त्यांनी आपल्या वागण्यातून सातत्याने दाखवून दिले.

गरिबी काय असते, उपेक्षा काय असते, हे त्यांनी पुस्तकातून नव्हे तर स्वतःच्या अनुभवातून जाणले होते. त्यामुळेच गरीब, वंचित आणि दुर्लक्षित लोकांच्या वेदना त्यांना स्वतःच्या वाटायच्या. शब्दांपेक्षा कृतीवर त्यांचा अधिक विश्वास होता, आणि त्यांची प्रत्येक कृती ही माणुसकीचे दर्शन घडवणारी होती.

आज प्रा. आर. एस. पाटील सर आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांनी घडवलेले असंख्य विद्यार्थी, त्यांनी रुजवलेली मूल्ये आणि त्यांनी जपलेली माणुसकी आज ही जिवंत आहे.अनेकांच्या यशामागे त्यांच्या मार्गदर्शनाचा हात आहे, तर अनेकांच्या आयुष्यातील अंधारात त्यांनी पेटवलेला आशेचा दीप आजही उजळतो आहे. त्यांच्या शब्दांची ऊब, त्यांच्या कृतींची प्रेरणा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा काळाच्या ओघात ही कधीही पुसला जाणार नाही.

प्रा. आर. एस. पाटील सर यांचे जाणे ही केवळ एका व्यक्तीची हानी नाही, तर एका संवेदनशील विचारसरणीची, एका दिलदार माणसाची आणि माणुसकीच्या परंपरेची मोठी पोकळी आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, विद्यार्थ्यांना व आप्तस्वकीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. 

सर, तुम्ही आज आमच्यात नसाल…पण तुम्ही दिलेली माणुसकी, घडवलेली माणसं आणि दिलेला आधार कायम आमच्या सोबत राहील.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !