जिवंतपणीची साथ हीच खरी श्रद्धांजली.....!
जिवंतपणीची साथ हीच खरी श्रद्धांजली.....!
आपल्या आयुष्यात माणसं येतात… काही काळासाठी, तर काही आयुष्यभरासाठी. ती आपल्या सोबत चालतात, आपले सुख-दुःख वाटून घेतात, कधी शब्दांनी तर कधी फक्त शांत उपस्थितीने आपल्याला आधार देतात. पण दुर्दैवाने, ही माणसं आपल्या सोबत असतानाच आपण त्यांचे महत्त्व ओळखू शकत नाही.
“आहेतच की…” या गृहितकात आपण त्यांना गृहीत धरतो. आज नाही तर उद्या भेटू, वेळ मिळेल तेव्हा बोलू, असं म्हणत आपण आजचा क्षण पुढे ढकलतो. पण वेळ कधी थांबत नाही. आणि माणूस गेल्यावर उरते ती फक्त पोकळी… जी कोणत्याही शब्दांनी भरून निघत नाही.
माणूस जोपर्यंत हयात आहे, श्वास घेत आहे, आपल्याशी बोलू शकतो, तोपर्यंत त्याला दिलेलं प्रेम, आदर आणि साथ यालाच खरी किंमत असते. तो गेल्यावर त्याच्या मोठेपणाची, कर्तृत्वाची जाणीव होऊन काय उपयोग? त्या वेळी त्याच्या डोळ्यांत पाहून “तू आमच्यासाठी किती महत्त्वाचा होतास” असं सांगण्याची संधीच उरलेली नसते.
थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ अतिशय मार्मिकपणे म्हणायच्या “माणूस किती चांगला आहे, हे समजण्यासाठी त्याला मरावं लागतं.”ही ओळ आपल्या समाजावरचं कटू सत्य उघड करते. जिवंतपणी माणसाच्या चुका मोठ्या वाटतात, त्याचे गुण दुर्लक्षित राहतात. आणि तो गेल्यावर मात्र त्याच गुणांचं कौतुक, त्याच्या नावाने भाषणं, श्रद्धांजली!
मरणोत्तर सन्मान हा औपचारिक असतो,क्षणिक
असतो. पण जिवंतपणीची साथ ही खरी मानवता असते. संकटात दिलेला आधार, संघर्षात उभं राहणं, यशात दिलेली दाद हे सगळं माणसाला जिवंतपणी हवं असतं.
मृत माणसाला हारांची गरज नसते, पण जिवंत माणसाला तुमच्या शब्दांची, तुमच्या विश्वासाची, तुमच्या प्रेमाची गरज असते. थडग्यावर वाहिलेली फुलं त्याला दिसत नाहीत, पण आयुष्यात दिलेली साथ त्याला जगण्याची ताकद देते.
म्हणूनच, आज आपल्या अवतीभोवती असलेल्या माणसांकडे नीट पाहूया. आई-वडील, मित्र, नातेवाईक, सहकारी जे आज आपल्या सोबत आहेत, त्यांना आजच महत्त्व देऊया. कारण उद्या उशीर होऊ शकतो.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं.मरणोत्तर सन्मानापेक्षा जिवंतपणीची साथ खरंच श्रेष्ठ असते आणि ती साथ देण्याची वेळ आत्ताच आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा