त्यागमूर्ती माता रमाई...!
दि.७ फेब्रुवारी २०२६ ला असलेल्या त्यागमूर्ती रमाबाई भीमरावजी आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त लेख.
त्यागमूर्ती माता रमाई
माता रमाबाई भीमराव आंबेडकर,ज्यांना आपण प्रेमाने 'रमाई' म्हणतो, त्यांचे जीवन म्हणजे त्याग, सोशिकपणा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकार्याला दिलेला खंबीर आधार होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जे 'विश्वभूषण' बनले, त्यामागे रमाईंचे अढळ धैर्य उभे होते.
मातोश्री रमाईंचा १८९८ सालातील फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद ग्रामात झाला.भिकाजी धुत्रे (वलंगकर) आणि रखुमाबाई त्यांच्या पोटी जन्मलेल्या रमाचे बालपण गरिबीत गेले आणि लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. १९०६ सालातील एप्रिल महिन्याच्या चार तारखेला मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर (बाबासाहेब) यांच्याशी झाला. लग्नानंतर भीमरावांनी त्यांचे नाव 'रमा' ठेवले.
संसारातील खडतर प्रवास करून रमाई जीवन जगल्या. रमाईंचा संसार हा काट्यांचा मार्ग होता.बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशात असताना रमाईंनी अत्यंत हालाखीचे दिवस काढले.
काबाडकष्ट केले. बाबासाहेब लंडन आणि अमेरिकेत शिकत असताना घरात पैशांची चणचण होती. रमाईंनी शेण गोळा करणे, गोवऱ्या थापणे आणि लाकडे विकणे अशी कामे करून घर चालविले.त्यांना पाच अपत्ये होती झाली .यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न परंतु गरिबी असल्यामुळे औषधोपचाराअभावी यशवंत सोडून इतर चारही मुलांचा मृत्यू झाला. स्वतःची मुले दगावली असतानाही त्यांनी बाबासाहेबांच्या ध्येया आड दुःख येऊ दिले नाही.उलट
बाबासाहेबांना आधार दिला.बाबासाहेबांच्या यशात रमाईंचा वाटा सिंहाचा आहे. बाबासाहेब म्हणत असत की,"जर रमा नसती, तर मी आज जे काही आहे ते बनू शकलो नसतो."
जेव्हा बाबासाहेब परदेशातून परतले आणि त्यांनी दलित उद्धाराचे कार्य हाती घेतले, तेव्हा रमाईंनी समाजातील लोकांची सेवा केली.
मातोश्री रमाई आंबेडकरांच्या त्यागाची एक घटना अत्यंत हृदयस्पर्शी आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी मार्फत चालविले जाणारे एक सिद्धार्थ वसतीगृह (काही संदर्भग्रंथांत याचा उल्लेख 'धारवाडचे वसतीगृह' असाही येतो) होते.हे वसतीगृह धारवाड येथे होते,जेव्हा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशात होते आणि भारतात संस्था चालवण्यासाठी पैशांची मोठी चणचण भासत होती, तेव्हा या वसतीगृहातील मुलांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मुलांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे हे समजताच, रमाई मातेने क्षणाचाही विचार न करता आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि अंगावरील दागिने काढून दिले, जेणेकरून त्या मुलांच्या जेवणाची सोय होऊ शकेल. त्यांच्या याच अथांग प्रेमामुळे त्यांना 'आई' किंवा 'माता रमाई' असे संबोधले जाते .धारवाडच्या या वस्तीगृहात प्रामुख्याने दलित (तत्कालीन अस्पृश्य) समाजातील विद्यार्थी होते. विशेषतः ज्यांना उच्च शिक्षणासाठी शहरात राहण्याची सोय नव्हती, अशा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जात असे.ग्रामीण भागातील हुशार मुलांनी शहरात येऊन शिकावे आणि समाजात स्वाभिमानाने जगावे, हा यामागचा बाबासाहेबांचामुख्य हेतू होता.अत्यंत कष्टमय आणि त्यागी आयुष्य जगल्यानंतर २७ मे १९३५ रोजी मुंबईतील 'राजगृह' येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बाबासाहेबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
त्याग, सोशिकता आणि समिधेसारखे जळत राहून समाजाला प्रकाश देण्याचे दुसरे नाव म्हणजे माता रमाई होय.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यात त्यांचा वाटा एखाद्या भक्कम पायासारखा होता.माता रमाईचे जीवन सहनशील आणि त्यागी होते . त्यांचे जीवन कष्ट आणि संघर्षाने भरलेले होते. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले होते, तेव्हा रमाईंनी अत्यंत गरिबीत दिवस काढले. अनेकदा उपाशी राहून किंवा केवळ पाणी पिऊन त्यांनी संसार ओढला, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ दिला नाही. त्या बाबासाहेबांच्या कार्याचा आधारस्तंभ होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटले होते की, "जर रमाईचा पाठिंबा नसता, तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो." रमाईंनी संसाराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, जेणेकरून बाबासाहेब आपले पूर्ण लक्ष समाजकार्य आणि अभ्यासावर केंद्रित करू शकतील.
रमाईंनी समाजातील महिलांना एकत्र करून त्यांच्यात स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेऊन महिलांना स्वच्छतेचे महत्त्व आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.महाडच्या सत्याग्रहात त्या बाबासाहेबांच्या सोबत होत्या. नाशिक येथील मंदिर प्रवेशाच्या लढ्यातही त्यांनी महिलांचे नेतृत्व केले आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.रमाईंचे कार्य केवळ एका पत्नीपुरते मर्यादित नव्हते, तर त्या दीन-दलितांच्या, अनाथांच्या आणि शोषितांच्या 'आई' (रमाई) होत्या. त्यांचा त्याग आणि संयम हा सामाजिक क्रांतीचा पाया ठरला.
माता रमाईंनी त्यांच्या आयुष्यात पाच चार अपत्यांचे मृत्यू एका आईसाठी हे दुःख सुसह्य नव्हते, तरीही त्यांनी स्वतःला सावरले. आपल्या मुलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून त्यांनी समाजातील हजारो दीन-दलित मुलांना आपली मुले मानले.बाबासाहेब बॅरिस्टर झाल्यानंतर आणि उच्च पदावर असतानाही रमाईंनी आपला साधेपणा सोडला नाही. त्या कधीही सोन्या-नाण्यांच्या मागे लागल्या नाहीत. त्यांचा स्वाभिमान इतका मोठा होता की, कठीण काळातही त्यांनी कधी कोणासमोर हात पसरले नाहीत. रमाई केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर त्या संपूर्ण दलित समाजाच्या 'आई' होत्या. बाबासाहेब जर 'सूर्य' होते, तर रमाई त्या सूर्याला तेजोमय ठेवणारी 'प्रकाशशक्ती' होत्या. अशा या प्रकाशशक्तीला १२८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
साहित्यरत्न राज्यस्तरीय
पुरस्कार प्राप्त
परिवर्तनवादी साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.८०८७७४८६०९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा