शुद्ध विचारांची मशाल ‘बा, तथागता!’ आणि मानवमूल्यांचा पुनर्जन्म.....!
शुद्ध विचारांची मशाल ‘बा, तथागता!’ आणि मानवमूल्यांचा पुनर्जन्म.....!
माणूस म्हणजे केवळ हाडामांसांचे, डोळे-कान-हात-पाय असलेले जैविक अस्तित्व नव्हे. माणूस खरा माणूस ठरतो तो त्याच्या विचारांच्या पवित्रतेतून आणि आचरणाच्या उजेडातून. ज्याच्या अंतःकरणात करुणा, विवेक, न्याय, समता, बंधुभाव आणि प्रेम यांचा अखंड दीप तेवत असतो, तोच माणूस खऱ्या अर्थाने मानव ठरतो. माणसाचे माणूसपण त्याच्या अंतर्मनातून झळकते हेच मूलभूत, कालातीत आणि सार्वत्रिक सत्य अत्यंत प्रभावी शब्दांतून सुप्रसिद्ध मानवतावादी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक व कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी आपल्या चिंतनातून अधोरेखित केले.
दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्योदय जेष्ठ नागरिक संघ, एरंडोल येथे आयोजित झालेला कार्यक्रम केवळ ग्रंथप्रकाशनाचा सोहळा नव्हता; तो मानवी मनाच्या परिष्करणाचा, आत्मशुद्धीचा आणि मानवतावादी विचारांच्या पुनर्जागरणाचा एक पवित्र वैचारिक उत्सव होता. या दिवशी प्रा. वा. ना. आंधळे यांनी अहिराणी बोलीत अनुवादित केलेल्या ‘बा, तथागता!’ या विशाल काव्यग्रंथाचे तसेच त्यावर आधारित ‘विवेकी जाणिवांचा प्रज्ञा प्रवाह’ या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व मेडिटेशन तज्ज्ञ आचार्य मनोहरजी सुरदास यांच्या शुभहस्ते पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी श्रोत्यांना विचारांच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवले. “शुद्ध विचार आणि शुद्ध आचरण यांच्यातूनच मानवतावादाची खरी पायाभरणी शक्य आहे,” असे सांगत त्यांनी बुद्ध तत्त्वज्ञानाचे मर्म अत्यंत सहज, पण खोलवर उलगडून दाखवले. बुद्ध तत्त्वज्ञान हे केवळ धर्मग्रंथ नाही, तर सत्याशी भिडण्याचे धैर्य देणारा, आयुष्यभर चालणारा सत्यशोधाचा अखंड प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक माणसाने स्वतःची वैचारिकता, आचारसंहिता आणि माणूसपणाचे प्रत्येक कंगोरे घासून-पुसून परिशुद्ध करणे आवश्यक आहे.
जात-पात, उच-नीच, काळा-गोरा यांसारख्या भेदांच्या भिंती संपूर्णपणे कोसळल्या पाहिजेत आणि त्या अवशेषांवर प्रेम, करुणा, मैत्री, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुभाव यांचे भव्य मंदिर उभे राहिले पाहिजे हीच बुद्ध तत्त्वज्ञानाची आणि मानवतावादाची खरी हाक आहे, असे प्रा. डॉ. पगारे ठामपणे सांगत होते. त्यांच्या मते, “माणूस” आणि “माणसाचे मन” हीच मानवतावादाची केंद्रवर्ती प्रयोगशाळा आहे. संस्कारक्षम मानवी मनावर योग्य संस्कार झाले, तर आज विस्मरणात जात चाललेले माणूसपण पुन्हा नव्याने फुलू शकते.
आजच्या काळात माणूस आपल्या मूळ मूल्यांपासून दूर जात आहे. त्यामुळे माणूस आणि माणूसकीची व्याख्या नव्याने करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
मानवी मन परिशुद्धतेकडे नेले, तर जगातील दुःखाचा नायनाट शक्य आहे. परिशुद्ध मनच मानवतावादाचे सुखद, शांत आणि कल्याणकारी रूप जगासमोर उभे करू शकते. यातच मानवी जीवनकल्याणाचे अंतिम ध्येय दडलेले आहे. ‘बा, तथागता!’ या काव्याच्या अनुषंगाने पावणे दोन तास चाललेल्या प्रा. डॉ. पगारे यांच्या चिंतनवर्षावाने उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
या वेळी प्रमुख अतिथी आचार्य मनोहरजी सुरदास यांनी मानवी मनाच्या विविध अवस्थांवर अत्यंत सूक्ष्मतेने आणि सखोल प्रकाश टाकला. षड्रिपूंमधून मुक्त कसे व्हावे आणि मानवी कल्याणाच्या वाटेवर आत्मसाधनेचा प्रवास कसा करावा, हे त्यांनी प्रभावीपणे विशद केले.
‘बा, तथागता!’ हे विशाल काव्य मानवी जीवनासाठी दीपस्तंभ ठरेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांना मूळ मराठी साहित्यकृतीचे जनक म्हणून आणि प्रा. वा. ना. आंधळे यांना अस्सल अहिराणी अनुवादासाठी मनःपूर्वक अभिनंदन केले. हे दोघे कवी करत असलेले कार्य केवळ साहित्यिक नसून ते ऐतिहासिक आणि विश्वकल्याणकारी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या समारंभात समीक्षा ग्रंथासाठी लेखन करणाऱ्या समीक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार (साक्री), डॉ. रमेश सूर्यवंशी (कन्नड), नानाभाऊ माळी (हडपसर, पुणे), डॉ. देवदत्त बोरसे (बागलाण – नामपूर), कैलास पाटील (जळगाव), खेमराज पाटील (जळगाव), रमेश धनगर (गिरड – पाचोरा), डॉ. विजय शिरसाठ (चाळीसगाव), रमेश बोरसे (धुळे), सौ. रत्ना पाटील (फागणे), डॉ. माधव कदम (नंदुरबार), डॉ. वाल्मिक अहिरे (वडजी – भडगाव) आणि श्रीमती लतिका चौधरी (दोंडाईचा) यांचा समावेश होता. सर्वांना शाल, समीक्षा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
‘बा, तथागता!’ या विशाल काव्याचे अहिराणी अनुवादक व समीक्षा ग्रंथाचे संपादक प्रा. वा. ना. आंधळे यांचा सपत्निक सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. प्रास्ताविकातून त्यांनी अनुवादाची भूमिका स्पष्ट करत उपस्थित अतिथींचा परिचय करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत मनोहारी आणि शिस्तबद्ध
सूत्रसंचालन प्रा. खेमराज पाटील यांनी केले, तर भावपूर्ण आभार प्रदर्शन कवी निंबा पुना बडगुजर यांनी केले.
या प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक कार्यक्रमाचे नियोजन सूर्योदय जेष्ठ नागरिक संघाचे संचालक कवी पी. जी. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कवी निंबा पुना बडगुजर, विनायक कुलकर्णी, कवी झांबरे, प्रा. कैलास पाटील, डॉ. दीपक खरात, कमलनाम प्रतिष्ठानचे खजिनदार दिनेशभाऊ घुगे आणि सौरभ घुगे यांनी अत्यंत निष्ठेने, एकात्म भावनेने आणि अथक परिश्रमांनी केले.
हा कार्यक्रम म्हणजे केवळ साहित्याचा उत्सव नव्हता
तो माणूसपण जागवणारा, मानवतावादाची मशाल पेटवणारा आणि बुद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात संपूर्ण विश्वाला करुणा, प्रेम, न्याय आणि बंधुभावाने उजळवण्याचा एक पवित्र प्रयत्न होता. अशाच शुद्ध विचारांच्या पायावर उद्याचे अधिक सुंदर, अधिक मानवी, अधिक करुणामय आणि अधिक न्यायपूर्ण जग उभे राहील.हीच या वैचारिक उत्सवाची खरी फलश्रुती आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा