गरज पडल्यावर आठवण येणारी मेणबत्ती....!


गरज पडल्यावर आठवण येणारी मेणबत्ती....!

मनुष्यस्वभाव अत्यंत नाजूक असतो. आपल्याला कोणीतरी विनाकारण आठवण ठेवावी, आपल्यासाठी वेळ काढावा, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा मनापासून होते. पण वास्तव मात्र वेगळे असते. अनेकदा काही लोक आपली आठवण फक्त त्यांना गरज असते तेव्हाच घेतात. त्या क्षणी मनाला वेदना होतात वाटते, “मी इतकाच का? फक्त गरजेपुरताच?”जरा शांतपणे विचार केला, तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला एका साध्या उदाहरणात मिळते मेणबत्तीमध्ये.

मेणबत्ती दिवसभर कुठल्या तरी कोपऱ्यात पडून असते. सूर्यप्रकाशात तिला गरज नसते; कोणाचेही लक्ष तिच्याकडे जात नाही. पण अंधार दाटल्यावर, वीज गेल्यावर, संकट आलेले असताना.तेंव्हा सर्वांना मेणबत्तीची आठवण येते. कारण तिच्यात अंधार दूर करण्याची ताकद असते. ती स्वतः जळते, वितळते, पण इतरांना प्रकाश देते. ती कधी तक्रार करत नाही. “दिवसभर मला का आठवलं नाही?” ती फक्त आपलं काम करते अंधार दूर करण्याचं.

आपणही अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशीच मेणबत्ती असतो. लोक आपली आठवण तेव्हाच घेतात, जेव्हा त्यांना आधार हवा असतो, मदत हवी असते, किंवा सल्ला हवं असतो. हो, आपल्यालाही प्रेम, आपुलकी, आणि विनाकारण आठवण हवी असते. पण गरजेच्या क्षणी ज्या व्यक्तीकडे सर्वांचा विश्वास असतो, त्या व्यक्तीकडे लोक नक्की वळतात.

गरज पडल्यावर आठवण येणे हे आपली किंमत कमी झाली याचा संकेत नाही. उलट, हे आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते, आपल्या अस्तित्वाच्या महत्त्वाची
आठवण करून देते. कारण प्रत्येकजण प्रत्येकाकडे धावत नाही; संकटाच्या क्षणी माणूस त्या व्यक्तीचं नाव घेतो, ज्याच्यावर त्याला पूर्ण विश्वास असतो.

हो, कधी कधी मनाला वेदना होते, वाटते“माझी आठवण आनंदात का येत नाही?” पण हे लक्षात ठेवायला हवं की प्रत्येक माणसाचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं असतं. आणि त्या संघर्षात जर आपण कोणासाठी उजेड ठरू शकत असू, तर त्यापेक्षा मोठं समाधान काहीच नाही.

मेणबत्ती लहान असते, पण अंधार कितीही मोठा असला तरी ती त्याला आव्हान देऊ शकते. तसंच, आपल्या अस्तित्वाचं महत्त्व आपल्याला इतरांच्या गरजेच्या क्षणी समजतं. म्हणून, कोणी फक्त गरज पडल्यामुळे आपली आठवण घेतली, तर वाईट वाटू नका. कारण आपण त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा उजेड आहोत. आणि उजेड देणाऱ्याची किंमत नेहमीच असते, जरी ती अंधारातच का होईना जाणवली तरी.

आठवण काही वेळा आपल्याला वेदना देते असं वाटतं, पण खरी गोष्ट ही आहे की ती आपल्याला दुसऱ्याच्या अस्तित्वाशी जोडते. जसं मेणबत्ती अंधारात प्रकाश देते, तसंच एखाद्याची आठवण त्याच्या अनुपस्थितीत आपल्याला जिवंत ठेवते. आपल्याला त्यांच्या गरजेचा अहसास असतो, पण तेच क्षण आपल्याला एक अद्भुत उब आणि प्रेमाची अनुभूती देतात.

यश, अपयश, भेटी, निराशा सगळ्यात एकमेव गोष्ट कायम राहते ती म्हणजे आठवण. ती आपल्याला आठवण करून देते की जीवनात खरे प्रेम, खरे नाते, खरे क्षण, हे कधीही विसरता येत नाहीत. जिथे आपण वाईट वाटतो, तिथे आपण त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचं महत्त्व अधिक जाणतो.

म्हणून, जेव्हा कोणी आपली आठवण गरजेवरून काढतो, तेव्हा वाईट वाटू नका. त्यांचा हा क्षण आपल्यासाठी एक उजळलेली मेणबत्तीसारखा आहे.जळते, प्रकाश देते, अंधारातही उब देते. आठवणीतल्या त्या प्रकाशात आपण पुन्हा जीवनाशी, प्रेमाशी आणि आपल्या प्रत्येक अनुभवाशी जोडले जातो.

आठवण, कधीही वाईट नसते. ती आपल्याला जिवंत ठेवते, आपल्याला प्रेम शिकवते, आणि अंधारातही प्रकाश देणारी मेणबत्ती ठरते.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !